(जैतापूर / राजन लाड)
“टीबी मुक्त भारत” अभियानाच्या अनुषंगाने अणसुरे उपकेंद्राच्या कार्यक्षेत्रात क्षयरोग प्रतिबंधक उपाययोजनेचा भाग म्हणून एक विशेष एक्स-रे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात एकूण १६६ नागरिकांची मोफत एक्स-रे तपासणी करण्यात आली.
तपासणी प्रामुख्याने ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, मधुमेहग्रस्त रुग्ण, तसेच मागील काही वर्षांत टीबीचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींमध्ये करण्यात आली. या उपक्रमाचा मुख्य उद्देश संशयित टीबी रुग्णांची वेळेत ओळख करून त्यांच्यावर त्वरित उपचार सुरू करणे, व समाजात रोगाचा फैलाव रोखणे हा होता.
शिबिराच्या आयोजनात ग्रामपंचायत अणसुरेचे सरपंच श्री. रामचंद्र कणेरी यांनी पुढाकार घेतला. यावेळी जिल्हा क्षयरोग नियंत्रण केंद्राचे पीपीएम समन्वयक श्री. श्रीकांत सावंत, आरोग्य सहायक श्री. मंगेश पाटील, क्ष-किरण तंत्रज्ञ श्री. निलेश हंगे, क्षयरोग पर्यवेक्षक श्री. राहुल कोकणे, आणि प्रयोगशाळा पर्यवेक्षक सौ. आचल मेळेकर यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमात प्राथमिक आरोग्य केंद्र, जैतापूर येथील सुपरवायझर श्री. महेश गावडे यांनी तपासणीबाबत मार्गदर्शन केले. याशिवाय, उपकेंद्रातील आरोग्य सेविका श्रीमती वसावे, आरोग्य सेवक श्री. चौगुले, श्रीमती माळी गोरे, समुदाय आरोग्य अधिकारी श्री. अर्जुन साखर, श्रीमती रूमडे, तसेच गटप्रवर्तक आणि आरोग्य विभागातील कर्मचारी यांनी शिबिराच्या आयोजनात महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवला.
या उपक्रमातून समाजात क्षयरोगासंबंधी जागरूकता वाढवणे आणि संशयित रुग्णांना लवकरात लवकर तपासणीसाठी प्रोत्साहित करणे हा सामाजिक आरोग्यविषयक उद्देश साध्य झाला. स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला.

