(मुंबई / प्रतिनिधी)
कोकण विभागात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पर्जन्यमान होत असल्याने नदी-नाल्यांना पूर येतो आणि अनेक गावांचा मुख्य प्रवाहाशी संपर्क तुटतो. या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात ग्रामीण भागातील वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी साकव दुरुस्तीला प्राधान्य द्यावे, अशा स्पष्ट सूचना ग्रामविकास व पंचायतराज राज्यमंत्री डॉ. योगेश कदम यांनी दिल्या.
मंत्रालयात आयोजित बैठकीत बोलताना डॉ. कदम म्हणाले, “गावांचा संपर्क टिकवण्यासाठी साकव ही अत्यंत महत्त्वाची व्यवस्था आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी कोकणातील अस्तित्वात असलेले साकव तातडीने दुरुस्त करण्यात यावेत. कुठेही दुरुस्तीच्या अभावामुळे गावांचा संपर्क तुटू नये, याची दक्षता घ्यावी.”
या बैठकीस ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले उपस्थित होते. तर दूरदृष्य प्रणालीद्वारे कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, तसेच रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सहभाग नोंदवला.
राज्यमंत्री कदम यांनी यंत्रणांना स्पष्ट सूचना दिल्या की, संभाव्य धोकादायक साकवांची यादी तयार करून दुरुस्तीसाठी निधीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्यात यावा. यासोबतच जिल्हास्तरावर समन्वय ठेवत आवश्यक उपाययोजना करण्याचेही निर्देश देण्यात आले.

