(रत्नागिरी / वैभव पवार)
महाराष्ट्रातील भीषण दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कोकण मराठी साहित्य परिषदेने (कोमसाप) आपले १८ वे मध्यवर्ती साहित्य संमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. हे संमेलन २७ ते २९ नोव्हेंबरदरम्यान मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकात आयोजित करण्यात येणार होते. मात्र, राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संमेलनाचे नियोजित आयोजन रद्द करून ते अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. वाङ्मयीन पुरस्कारांचे वितरण मुंबई किंवा ठाणे येथे स्वतंत्रपणे करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर आणि कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ यांनी दिली.
रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी कोमसापचे कार्यवाह माधव अंकलगे, १८ व्या साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष अभिजित हेगशेट्ये, कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन ऊर्फ आबा पाटील, युवा समितीचे अरुण मोर्ये आणि जिल्हा सचिव मुश्ताक खान उपस्थित होते.
कोमसापचे विश्वस्त आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केल्यानंतर संमेलन पुढे ढकलण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. संमेलनाच्या आयोजनासाठी जोरदार तयारी सुरू होती. मात्र, १९७२ नंतर महाराष्ट्रात निर्माण झालेल्या अत्यंत भीषण दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे नमिता कीर यांनी स्पष्ट केले.
राज्यातील ४०० हून अधिक तालुके दुष्काळग्रस्त असून विदर्भ, मराठवाड्यासह कोकणातही पाणी, चारा आणि अन्नधान्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. अशा संकटाच्या काळात साहित्य संमेलनाचे आयोजन करणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका कोमसापने घेतली आहे. राज्यातील परिस्थिती सुधारल्यानंतरच १८ व्या मध्यवर्ती साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे.
दरम्यान, वाङ्मयीन पुरस्कार वितरण सोहळ्याची नवीन तारीख मधुमंगेश कर्णिक यांच्याशी चर्चा करून लवकरच जाहीर केली जाणार असल्याचेही नमिता कीर आणि प्रदीप ढवळ यांनी सांगितले.


