(राजापूर / तुषार पाचलकर)
तालुक्यातील सोंदळ येथे अर्जुना नदीच्या पात्रात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आज (रविवार, १ नोव्हेंबर २०२६) रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कोंड येथील राजू सातकूट यांच्या आंब्याच्या बागेजवळ ही घटना उघडकीस आली. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ४५ ते ५० वर्षे असून, अद्याप त्याची ओळख पटलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुना नदीच्या पाण्यात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. मृतदेह बराच वेळ पाण्यात राहिल्याने शरीर फुगलेल्या अवस्थेत होता. चेहरा आणि शरीर सुजलेले असून, मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. मृत व्यक्तीच्या अंगात चॉकलेटी रंगाची हाफ पँट असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती समृद्धी सिद्धांत पाटील (वय ३२, पोलीस पाटील, रा. पाटीलवाडी, सोंदळ, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) यांनी दिली. त्यांच्या माहितीवरून राजापूर पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाची नोंद आज सायंकाळी ४.२६ वाजता करण्यात आली.
मृतदेह ग्रामीण रुग्णालय, रायपाटण येथे पुढील वैद्यकीय प्रक्रियेसाठी पाठविण्यात आला आहे. मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली psi मोबीन शेख करीत आहेत.
मृत व्यक्तीची ओळख किंवा अन्य कोणीही माहिती अद्याप समोर आलेली नसल्याने पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.


