( मुंबई )
भांडुप रेल्वे स्थानकाबाहेर गेल्या आठवड्यात झालेल्या भीषण बस अपघाताबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अपघातासाठी बसमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचा दावा चालकाने केला होता. मात्र प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केलेल्या सखोल तपासणीत बस पूर्णपणे यांत्रिकदृष्ट्या सक्षम असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हा अपघात चालकाच्या चुकीमुळेच झाल्याचे आता उघड झाले आहे.
आरटीओकडून अपघातग्रस्त इलेक्ट्रिक बसची सविस्तर यांत्रिक तपासणी करण्यात आली. या तपासणीत ब्रेकिंग सिस्टीम, हँडब्रेक, एक्सिलेटर आणि ट्रान्समिशन यंत्रणेत कोणताही दोष आढळला नाही. तपासणी अहवालानुसार वाहनात तांत्रिक बिघाडाचे कोणतेही चिन्ह नसून बस सुरक्षित स्थितीत असल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे बस अचानक पुढे गेली, हा चालकाचा दावा खोटा ठरला आहे.
या प्रकरणात चालक संतोष रमेश सावंत (वय ५२) यांनी हँडब्रेकमध्ये बिघाड झाल्यामुळे बस अनियंत्रित झाल्याचे सांगितले होते. मात्र आरटीओच्या तपासणी अहवालामुळे हा दावा फेटाळण्यात आला असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पल्लवी कोठावडे यांनी दिली आहे. यामुळे आता तपासाचा रोख मानवी निष्काळजीपणा आणि ठरवून दिलेल्या कार्यपद्धतींचे पालन झाले होते की नाही, यावर केंद्रित करण्यात आला आहे.
दरम्यान, भांडुप पोलिस ठाण्याने या अपघातप्रकरणी तपास अधिक सखोल केला होता. चालकाचा जबाब नोंदवण्यात आला असून अपघाताच्या वेळी वाहन कसे हाताळले गेले, आवश्यक सुरक्षात्मक उपाय पाळण्यात आले होते का, याची सखोल चौकशी केली. तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपपत्रात आरटीओच्या निष्कर्षांचा समावेश केला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
अपघातानंतर बेस्ट प्रशासनाचा मोठा निर्णय
भांडुप बस अपघातानंतर बेस्ट प्रशासनही सतर्क झाले आहे. इलेक्ट्रिक बस आणि डिझेल बस चालवण्याच्या पद्धतींतील फरक लक्षात घेता चालकांसाठी विशेष प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी चालकांचे कौशल्य, सुरक्षितता आणि नियमपालनावर अधिक भर देण्यात येणार असल्याचे बेस्ट प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

