(संगमेश्वर / एजाज पटेल)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गोळवली ते तुरळदरम्यान रस्त्याच्या मध्यभागी रविवारी, १ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास मादी बिबट्या मृतावस्थेत आढळून आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या एका सतर्क प्रवाशाच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी मादी बिबट्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी मृत बिबट्याला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर आणि वैद्यकीय प्रक्रियेसाठी साडवली येथे आणले.
रविवारी सकाळी साखरपा येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या अधिकाऱ्यांनी मृत बिबट्याचे नियमानुसार शवविच्छेदन केले. यावेळी बिबट्याचे सर्व अवयव सुस्थितीत असल्याचे आढळून आले. आवश्यक शासकीय व वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर वनविभागाने लाकडाची चिता रचून सर्व अवयवांसह मृत मादी बिबट्यावर दहनसंस्कार केले.
या प्रकरणी वनपाल संगमेश्वर-देवरुख यांनी प्र.गु.रि. क्रमांक वप्रार २४/२०२६, दिनांक १ नोव्हेंबर २०२६ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ही संपूर्ण कारवाई विभागीय वनाधिकारी रत्नागिरी श्रीमती गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी-चिपळूण श्रीमती प्रियंका लगड आणि परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी श्री. विक्रम गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी वनपाल संगमेश्वर-देवरुख श्री. सागर गोसावी, वनरक्षक आरवली श्री. सूरज तेली, वनरक्षक फुणगूस श्री. आकाश कडुकर, वनरक्षक दाभोळे श्रीमती सुप्रिया काळे तसेच स्थानिक पंच उपस्थित होते.
दरम्यान, महामार्गावर किंवा ग्रामीण भागात वन्यप्राणी जखमी, मृत अथवा अडचणीत आढळल्यास नागरिकांनी स्वतःहून त्यांना हाताळण्याचा प्रयत्न करू नये. अशा घटनांची माहिती तातडीने वनविभागाच्या १९२६ या टोल फ्री क्रमांकावर किंवा ९०९६५७८७६१ या भ्रमणध्वनी क्रमांकावर द्यावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर वन्यप्राण्यांचा वावर आणि अशा घटनांमुळे वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


