(लोणावळा /पुणे )
मुसळधार पावसामुळे उद्भवणाऱ्या संभाव्य दुर्घटना आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी लोणावळा ग्रामीण पोलीस हद्दीत भारतीय नागरीक सुरक्षा संहिता (BNSS) 2023 च्या कलम 163 अंतर्गत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. हे आदेश 6 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून 31 जुलै रोजी पहाटे 6 वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.
पावसाळ्यात देश-विदेशातून हजारो पर्यटक लोणावळा परिसरात येत असल्याने प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विशेषतः शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी होणारी प्रचंड गर्दी, वाहतूक कोंडी आणि पावसामुळे होणाऱ्या दुर्घटना लक्षात घेऊन हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
एकवीरा देवी मंदिर, कार्ला लेणी, भाजे लेणी, भाजे धबधबा, लोहगड किल्ला, विसापूर किल्ला, तिकोणा किल्ला, तुंग किल्ला, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट, शिवलिंग पॉईंट आणि पवना धरण या प्रमुख पर्यटनस्थळांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.
प्रशासनाने सांगितले की, पवना धरण, धबधबे आणि डोंगराळ भागात पाण्याचा अंदाज न आल्याने दरवर्षी दुर्घटना घडतात. अचानक पाण्याचा प्रवाह वाढणे, घसरडी ठिकाणे आणि खोल दऱ्यांमुळे पर्यटकांचा जीव धोक्यात येतो. यापूर्वीही लोणावळा परिसरात अचानक आलेल्या पावसामुळे पर्यटक वाहून जाण्याच्या आणि मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे यंदा सुरक्षेच्या दृष्टीने अधिक कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
लोणावळ्यात 31 जुलैपर्यंत ‘या’ 12 गोष्टींवर बंदी
- वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे किंवा पोहणे.
- धबधब्याखाली उभे राहणे किंवा धबधब्यावर जाणे.
- धोकादायक कडे, दऱ्या, धबधबे आणि इतर संवेदनशील ठिकाणी सेल्फी किंवा व्हिडिओ शूट करणे.
- धबधबा आणि नैसर्गिक पर्यटनस्थळी मद्यपान करणे, मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, वाहतूक करणे किंवा अनधिकृत विक्री करणे.
- रस्ते किंवा धोकादायक ठिकाणी वाहने उभी करणे.
- अतिवेगाने किंवा वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन चालवणे.
- बेदरकारपणे ओव्हरटेक करून इतर वाहनांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणे.
- सार्वजनिक ठिकाणी कचरा, प्लास्टिक, काचेच्या बाटल्या, थर्माकोल किंवा इतर प्रदूषणकारी वस्तू फेकणे.
- महिलांची छेडछाड किंवा सार्वजनिक शांतता भंग करणारे कृत्य करणे.
- मोठ्या आवाजात डीजे, स्पीकर, वूफर किंवा संगीत यंत्रणा वाजवणे.
- ध्वनी, वायू किंवा जलप्रदूषण होईल असे कोणतेही कृत्य करणे.
- धबधबे, धरणे आणि नदी परिसरात दुचाकी, चारचाकी तसेच सहाचाकी वाहनांना प्रवेश.
पोलीस प्रशासनाने पर्यटकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असून, निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा दिला आहे. पावसाळ्यात पर्यटनाचा आनंद घेताना स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता जपण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

