(राजापूर)
तालुक्यातील पन्हळे तर्फे सौंदळ येथील एका ४१ वर्षीय तरुणाचा दारूच्या नशेत विषारी द्रव्य प्राशन केल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना ३० जानेवारी रोजी रात्री घडली असून, उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या राजापूर ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मृत व्यक्तीचे नाव रघुनाथ दत्ताराम चव्हाण (वय ४१, रा. पन्हळे तर्फे सौंदळ, चव्हाणवाडी, ता. राजापूर) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रघुनाथ चव्हाण हे दारूच्या व्यसनाधीन होते. ३० जानेवारी रोजी रात्री सुमारे १०.३० वाजता त्यांनी राहत्या घरी दारूच्या नशेत अज्ञात विषारी द्रव्य प्राशन केले. त्यानंतर त्यांना रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या.
प्रकृती गंभीर झाल्याचे लक्षात येताच नातेवाइकांनी त्यांना तातडीने राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच ३१ जानेवारी रोजी सकाळी ७.१० वाजता डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मयताचे चुलते विजय राजाराम चव्हाण यांनी राजापूर पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी या प्रकरणी बी.एन.एस.एस. कलम १९४ अंतर्गत आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.

