(संगमेश्वर / दिनेश अंब्रे)
संगमेश्वर तालुक्यातील नावडी (पोस्ट आळी) येथील रहिवासी श्री. ऋषिकांत भिकाजी शिवलकर हे गेली अनेक दशके चित्रकला, रंगकला, अभिनय आणि मूर्तीकलेच्या क्षेत्रात आपल्या अद्वितीय प्रतिभेने नावारूपाला आलेले हरहुन्नरी कलाकार आहेत.
सन 1970 साली त्यांनी चित्रकलेच्या क्षेत्रात पाऊल टाकले, त्या काळात गावात अगदी मोजक्याच पेंटर होते. भिंतीवरील चित्रकलेपासून (वॉलपीस), दुकानी बोर्ड तयार करणे, तसेच ४-५ फूट उंचीची देवी-देवता आणि संत-महंतांची चित्रे सहज रेखाटण्याची हातोटी त्यांच्याकडे होती. त्याचबरोबर विविध सण-उत्सवांत गावात आयोजित होणाऱ्या नाटकांमध्ये “पांडू हवालदार”, “दादा कोंडके” यांसारख्या लोकप्रिय भूमिका साकारून त्यांनी अभिनय क्षेत्रातही आपली छाप पाडली होती.
चित्रकलेसोबतच त्यांनी 1984 साली आपल्या चित्रशाळेतील ११ छोट्या गणेशमूर्तींनी “गणपती कारखाना” सुरू केला. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी कै. सौ. स्मिता यांचा खंबीर सहभाग होता. दोन मोठ्या मुलींच्या आणि नंतर मुलगा मंदार व तुषार यांच्याही सहकार्यामुळे कारखान्याची व्याप्ती आणि गुणवत्तेत लक्षणीय वाढ झाली. काही वर्षांतच मूर्तींची संख्या २१० पर्यंत पोहोचली.
सध्या वृद्धापकाळामुळे ऋषिकांत शिवलकर सेवेतून विश्रांती घेत आहेत. 2021 साली त्यांना ‘कलारत्न’ पुरस्कार देऊन गावातील सामाजिक संस्थांनी गौरवले आहे. आता त्यांचे पुत्र मंदार व तुषार हे दोघे भाऊ शिक्षकी पेशा सांभाळत मूर्तीकलेचा वारसा पुढे नेत आहेत. ग्राहकांच्या मागणीनुसार १ फूट ते ५ फूट उंचीच्या सुमारे २८० रेखीव मूर्ती तयार केल्या जात आहेत. विविध प्रकारातील बालगणेश मूर्ती बाराही महिने विक्रीसाठी उपलब्ध असतात.
- शाडू मातीबरोबरच पारंपरिक लाल मातीपासून मूर्ती तयार केल्या जातात.
- यावर्षी १ जूनपासून मातीकामास सुरुवात झाली असून २ जुलैपासून रंगकाम चालू आहे.
- कारखान्यात रंगकामाची लगबग सुरू असून, मूर्तींची नोंदणी आणि मागणी लक्षणीय प्रमाणात वाढली आहे.
रत्नागिरी तालुका तसेच, फुणगुस, पिरंदवणे, अंतरवली, करंबेळे, आणि संगमेश्वर पंचक्रोशीतील गणेशभक्त दरवर्षी येथे मूर्ती घेण्यासाठी येतात. यंदा १०% दरवाढ असूनही ग्राहकांची मागणी वाढत असल्याने, कोकणात गणेशकलेबद्दल असलेली श्रद्धा आणि या कलेचे संवर्धन याचा प्रत्यय येतो.
श्री. ऋषिकांत शिवलकर यांची ही कला परंपरा आणि त्यांच्या पत्नी कै. सौ. स्मिता यांचे योगदान आजही अनेकांना प्रेरणादायक ठरत आहे.

