(जैतापूर / वार्ताहर)
राजापूर तालुक्यातील सागरी महामार्गावरील गजबजलेल्या होळी स्टॉप येथे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रवासी निवारा शेडच्या उभारणीला अखेर सुरुवात झाली आहे. आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या स्वखर्चातून हे शेड उभारण्यात येत असून, नुकतेच जिल्हा परिषद सदस्या सोनाली ठुकरूल यांच्या प्रमुख उपस्थितीत या कामाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. या सुविधेमुळे ऊन-पावसात प्रवाशांना करावा लागणारा त्रास कमी होणार आहे.
होळी स्टॉप हे परिसरातील महत्त्वाचे केंद्र असून, येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा आहे. त्यामुळे रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांसह अनेक प्रवाशांची या ठिकाणी दिवसभर वर्दळ असते. मात्र, प्रवाशांसाठी निवारा शेड उपलब्ध नसल्याने भर उन्हात तसेच मुसळधार पावसात त्यांना उघड्यावर उभे राहून वाहनांची प्रतीक्षा करावी लागत होती. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही त्यावर तोडगा निघाला नव्हता.
प्रवाशांची ही गैरसोय दूर करण्यासाठी शिवसेना राजापूर तालुका महिला आघाडीच्या पदाधिकारी सिद्धी शिरशेकर आणि होळी शाखाप्रमुख शशांक उर्फ पिंट्या शिरवडकर यांनी हा प्रश्न आमदार किरण सामंत यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर सामंत यांनी तातडीने पुढाकार घेत स्वतःच्या खर्चातून सुसज्ज प्रवासी निवारा शेड उभारण्याचे आश्वासन दिले आणि कामाला सुरुवात करण्याचे निर्देश दिले.
सागरी महामार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी आमदार सामंत यांनी यापूर्वीही विविध ठिकाणी स्वखर्चातून निवारा शेड उभारल्या आहेत. त्याच धर्तीवर आता होळी स्टॉप येथेही प्रवाशांना निवाऱ्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. या कामाच्या नियोजनासाठी शिवसेना राजापूर तालुका प्रमुख दीपक नागले यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
भूमिपूजन सोहळ्याला परिसरातील शेकडो ग्रामस्थांसह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. प्रवाशांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल उपस्थितांनी आमदार किरण सामंत आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येणार असून, लवकरच आमदार किरण सामंत यांच्या हस्ते निवारा शेडचा लोकार्पण सोहळा पार पडेल आणि ही सुविधा प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल, अशी माहिती स्थानिक पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.


