(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील कळसवली-तरळवाडी येथील ८८ वर्षीय वृद्ध महिला सौ. पार्वती शिवराम तळेकर या गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असून, त्यांचा शोध घेण्यासाठी राजापूर पोलिसांनी व्यापक शोधमोहीम सुरू केली आहे. या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात नापत्ता रजिस्टर क्रमांक ११/२०२६ अंतर्गत नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौ. पार्वती तळेकर या दि. १७ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास कळसवली येथील राहत्या घरातून कोणालाही न सांगता बाहेर पडल्या. त्यानंतर त्या घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी प्रथम नातेवाईकांकडे तसेच गाव व परिसरात त्यांचा शोध घेतला. मात्र, सर्वतोपरी प्रयत्न करूनही त्यांचा कोणताही मागमूस लागला नाही. अखेर दि. १९ जुलै रोजी राजापूर पोलीस ठाण्यात त्या बेपत्ता असल्याची अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली.
सौ. पार्वती तळेकर यांचे वय ८८ वर्षे असून, केस पांढरे, रंग सावळा, नाक लांब व सरळ तसेच अंगाने सडपातळ आहेत. त्या घरातून बाहेर पडताना लाल रंगाची व त्यावर पांढऱ्या रंगाची फुले असलेली मॅक्सी असा पोशाख परिधान केला आहे. कपाळावर लाल रंगाची पिंजर, हातात हिरव्या रंगाच्या दोन बांगड्या, पायात जोडवी आणि गळ्यात पिवळ्या धातूचे खोटे मंगळसूत्र होते. त्यांच्याकडे कोणतीही ओळखपत्रे किंवा इतर वस्तू नाहीत.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, वाढत्या वयामुळे त्यांच्या मेंदूला रक्तपुरवठा कमी होत असल्याने त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. त्यामुळे त्यांना अनेकदा व्यक्ती ओळखण्यात अडचण येत होती. यापूर्वीही त्या दोन ते तीन वेळा घरातून बाहेर पडल्या होत्या. मात्र, त्यावेळी त्या सुखरूप मिळून आल्या होत्या. यावेळी मात्र तीन दिवस उलटूनही त्यांचा कोणताही शोध लागलेला नाही.
राजापूर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, वरील वर्णनाशी मिळतीजुळती वृद्ध महिला कुठेही आढळल्यास किंवा त्यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने राजापूर पोलीस ठाण्याशी किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. नागरिकांनी दिलेल्या माहितीमुळे सदर वृद्ध महिलेला सुरक्षितपणे कुटुंबीयांपर्यंत पोहोचविण्यास मदत होऊ शकते.

