(राजापूर / तुषार पाचलकर)
ग्रामीण रुग्णालय, राजापूर येथे बुधवार, दिनांक ७ ऑक्टोबर २०२६ रोजी जनरल शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण तीन जनरल शस्त्रक्रिया करण्यात आल्या. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप आणि डॉ. ज्ञानेश वीटेकर यांनी शल्यचिकित्सक म्हणून सेवा दिली, तर भूलतज्ज्ञ म्हणून डॉ. दत्तप्रसाद केतकर यांनी जबाबदारी सांभाळली.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय, राजापूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राम मेस्त्री, वैद्यकीय अधिकारी डॉ. आर्यन बहादुरे, डॉ. हर्षानी भुजाडे आणि डॉ. प्रसन्न यांच्यासह रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. स्टाफ नर्स बोरकर, लांजेकर, वाघाटे, नाटेकर, राठोड आणि महाडिक तसेच शिपाई पवार, ताटे, जाधव आणि नाखरेकर यांनी शिबिराच्या नियोजनात आणि अंमलबजावणीत सहकार्य केले.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत अशा प्रकारची जनरल शस्त्रक्रिया शिबिरे यापुढे दर महिन्याला ग्रामीण रुग्णालय, राजापूर येथे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. राम मेस्त्री यांनी दिली. या उपक्रमामुळे परिसरातील रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी आवश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
राजापूर आणि लांजा तालुक्यांतील जास्तीत जास्त रुग्णांनी या शस्त्रक्रिया शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. राम मेस्त्री यांनी केले आहे.


