(राजापूर / वार्ताहर)
वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी महावितरणचे अनेक कर्मचारी रात्रंदिवस, जीव धोक्यात घालून काम करत असतात. राजापूर तालुक्यात यापूर्वी घडलेल्या काही दुर्दैवी घटनांत या कर्तव्यदक्ष ‘प्रकाशदूतां’ना आपला जीवही गमवावा लागला आहे. काही ठिकाणी मोजक्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे संपूर्ण यंत्रणेकडे संशयाने पाहिले जाते. याचा फटका मात्र प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहन करावा लागतो, ही बाब खेदजनक असल्याचे नागरिकांकडून व्यक्त केले जाते.
अशा परिस्थितीतही महावितरण कर्मचाऱ्यांनी कर्तव्यनिष्ठेचे आणि जबाबदारीचे उदाहरण प्रजासत्ताक दिनी दाखवून दिले आहे.
धारतळे सब-स्टेशन अंतर्गत येणारा ११ के.व्ही. नाटे फिडर प्रजासत्ताक दिनाच्या पहाटे सुमारे २.३० वाजता अचानक ब्रेकडाऊन झाला. त्यामुळे ग्रामपंचायत नाटे, साखरी नाटे, आंबोळगड आणि धाऊलवल्ली या गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. प्रजासत्ताक दिन अंधारात जाण्याची भीती निर्माण झाली होती.
मात्र महावितरण शाखा कार्यालय आडीवरे अंतर्गत कार्यरत प्रधान तंत्रज्ञ श्री. प्रकाश पालकर, तंत्रज्ञ श्री. अनिकेत चव्हाण आणि बाह्यस्त्रोत तंत्रज्ञ श्री. योगेश कांबळे यांनी कोणतीही सबब न देता तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. रात्रीचा अंधार आणि संभाव्य धोके यांची पर्वा न करता त्यांनी एच.टी. लाईनच्या पोलवरील दोष शोधून अवघ्या एका तासात दुरुस्ती पूर्ण केली. रात्री सुमारे ३.३० वाजताच वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.
या तत्पर आणि प्रामाणिक सेवेचा परिणाम असा झाला की सकाळी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांच्या वेळी सर्व गावांमध्ये वीजपुरवठा सुरळीत सुरू होता. शाखा अधिकारी श्री. भिसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी “प्रजासत्ताक दिन विना वीज साजरा होऊ नये” यासाठी घेतलेली ही जबाबदारी नागरिकांकडून विशेष कौतुकास पात्र ठरत आहे.
महावितरणमध्ये काही मोजक्या कामचुकारांमुळे संपूर्ण यंत्रणेची प्रतिमा मलिन होत असली, तरी अशा घटनांमधून हे स्पष्ट होते की आजही अनेक कर्मचारी निःस्वार्थपणे, प्रामाणिकपणे आणि जीवावर उदार होऊन सेवा बजावत आहेत. समाजाच्या अंधारात उजेड निर्माण करणाऱ्या या खऱ्या अर्थाने ‘प्रकाशदूतां’चे कौतुक, प्रोत्साहन आणि संरक्षण होणे हीच काळाची गरज असल्याचे नागरिकांनी सांगितले.

