(डोंबिवली)
डोंबिवली एमआयडीसीतील फेज 1 मध्ये आग लागल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी (ता. 23 जुलै) दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास एमआयडीसी फेज 1 मध्ये असणाऱ्या एरोसिल या कपड्यांच्या कारखान्याला भीषण आग लागली. अवघ्या काही मिनिटांमध्येच ही आग वाढली आणि या आगीने संपूर्ण कारखान्याला आपल्या भक्ष्यस्थानी घेतले.
डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील कपड्यावर प्रक्रिया करणाऱ्या एअरोसिल कंपनीत आज दुपारी लागलेल्या भीषण आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी वित्तीय नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याचे सांगितले जात आहे. आग विझवण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका आणि एमआयडीसीच्या एकूण चार अग्निशमन गाड्यांचा ताफा घटनास्थळी तातडीने दाखल झाला.
ही घटना डोंबिवली एमआयडीसी फेज-१ मधील मानपाडा पोलीस ठाण्याच्या मागील भागात घडली. एअरोसिल कंपनीत कपड्यावर प्रक्रिया केली जाते. यावेळी दुपारी अचानक आग लागली, सुरुवातीला आगीचे स्वरूप सौम्य होते. मात्र, कपड्यांचा साठा असलेल्या विभागात आग पोहोचताच ती वेगाने पसरली आणि भीषण रूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच कंपनीतील सर्व कर्मचारी आणि कामगार वेळेत बाहेर पडल्यामुळे कोणतीही जिवितहानी झाली नाही. तातडीने परिसरात धोक्याचा इशारा देण्यात आला.
आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन प्रमुख नामदेव चौधरी यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचे अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले. आगीच्या तीव्रतेमुळे आणि आजूबाजूच्या कंपन्यांना संभाव्य धोका लक्षात घेता, प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यात आला. त्यामुळे आणखी चार अग्निशमन पथकांना पाचारण करण्यात आले.
चारही दिशांनी अग्निशमन दलाच्या जवानांनी उच्चदाबाने पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू ठेवले. शेजारील कंपन्यांना आग पसरू नये यासाठी विशेष दक्षता घेतली जात होती. मानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, आगग्रस्त कंपनीकडे जाणारे सर्व मार्ग बंद करून बघ्यांची गर्दी हटवण्यात आली. आग विझवण्याच्या दरम्यान अधूनमधून पावसाच्या सरी पडत होत्या. मात्र, वाऱ्याचा अभाव असल्यामुळे जवानांना आग विझवण्यात तुलनेने अधिक सोय झाली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कल्याण-अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष देवेन सोनी आणि इतर पदाधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मदतीसाठी अधिक यंत्रणांची गरज आहे का याची माहिती घेतली. त्यावेळी चार अग्निशमन गाड्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुरेशा असल्याचे अग्निशमन विभागाने स्पष्ट केले.
दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली याची अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र, प्राथमिक माहितीनुसार शॉर्टसर्किट किंवा कपड्यावर प्रक्रिया करताना झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष चौकशीअंतीच नेमके कारण स्पष्ट होईल, असे सांगितले.