(मुंबई)
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या मालकीच्या कंपनीवर मोठा आरोप करण्यात आला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी असा दावा केला आहे की, पार्थ पवार यांच्या कंपनीने पुण्यातील कोरेगाव पार्क येथील सुमारे ४० एकर जमीन, ज्याची बाजारभावाने किंमत तब्बल १८०० कोटी रुपये आहे, ती केवळ ३०० कोटींमध्ये विकत घेतली.
या व्यवहारात सुमारे २५ कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी माफ करून फक्त ५०० रुपये भरून नोंदणी करण्यात आल्याचा गंभीर आरोप दानवे यांनी केला आहे.
या प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त करत या व्यवहारात कुठेही अनियमितता झाली असेल, तर कारवाई झालीच पाहिजे, असे सांगत त्यांनी चौकशीचे आदेश दिले होते. दरम्यान, चौकशीत प्राथमिक अनियमितता आढळून आल्याने पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले यांना निलंबित करण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे.
या प्रकरणावर अजित पवार किंवा पार्थ पवार यांनी अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे पवार यांची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अजित पवार यांनी याबाबत आज पत्रकारांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. अजित पवार यांना पत्रकारांनी याबाबत विचारले असता ते काहीही न बोलता निघून गेले. यामुळे पार्थ पवार यांच्याबाबत करण्यात आलेल्या आरोपांचा नेमका अर्थ काय समजायचा? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सध्या चौकशीत तहसीलदारांसह संबंधित तलाठी, सर्कल अधिकारी आणि प्रांताधिकारी यांनी व्यवहाराच्या नोंदी कशा दाखवल्या, कागदपत्रे जिल्हाधिकाऱ्यांकडे कधी सादर केली, आणि व्यवहारात गुप्तता का ठेवली, याची चौकशी सुरू असल्याचे समजते.
दुय्यम निबंधक रवींद्र तारू निलंबित
या प्रकरणाचा तपास वाढवत आता दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांनाही निलंबित करण्यात आले आहे. नोंदणी प्रक्रिया बेकायदा पद्धतीने पार पडल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत असे दिसून आले आहे की, या ४० एकर जमिनीचा व्यवहार मूळ मालक आणि सरकारची फसवणूक करून करण्यात आला, तसेच मुद्रांक शुल्क विभागाच्या नोंदींमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

