(मुंबई)
महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठी गुरुवारी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. या निवडणूक प्रक्रियेचा थेट परिणाम शाळांवर होणार असून, काही भागांमध्ये विद्यार्थ्यांना सलग सुट्ट्या मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिक्षकांवर लावण्यात आलेल्या निवडणूक ड्युटीमुळे आणि शाळा मतदान केंद्र म्हणून वापरल्या जाणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे 14 जानेवारी रोजी मकरसंक्रांतीची सुट्टी आहे. मात्र मुंबईतील महानगरपालिका शाळा या दिवशी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. निवडणूक आयोगाकडून अनेक शाळा मतदानासाठी ताब्यात घेतल्या जाणार असल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यास खंडित होऊ नये, हा निर्णय घेतल्याची माहिती देण्यात आली आहे.
15 जानेवारीला शाळांना सुट्टी
मुंबई महापालिकेच्या शिक्षण उपायुक्त डॉ. प्राची जांभेकर यांनी स्पष्ट केले की, 15 जानेवारी रोजी मतदानाच्या दिवशी सर्व शाळांना सुट्टी राहणार आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा जवळ आल्याने त्यांच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.
मतमोजणीच्या दिवशीही सुट्टीची मागणी
16 जानेवारी रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या दिवशीही शाळांना सुट्टी देण्यात यावी, अशी मागणी मुंबई मुख्याध्यापक संघटनेच्या उत्तर विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी केली आहे. मतदानानंतर ईव्हीएम आणि कागदपत्रांच्या कामासाठी शिक्षकांना रात्री उशिरापर्यंत केंद्रांवर थांबावे लागते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी शाळेत वेळेत हजर राहणे कठीण होऊ शकते, असा युक्तिवाद करण्यात आला आहे. मात्र या मागणीवर अद्याप प्रशासनाचा अधिकृत निर्णय झालेला नाही.
शिक्षकांवर निवडणूक ड्युटीचा ताण
महापालिका निवडणुकीसाठी 14 आणि 15 जानेवारी रोजी शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर निवडणूक ड्युटी लावण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया संपल्यानंतरही अनेक शिक्षकांना केंद्रांवर थांबावे लागणार असल्याने 16 जानेवारी रोजी शाळा सुरू ठेवणे व्यवहार्य आहे का, यावर प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सलग 5 दिवस सुट्ट्यांची शक्यता
14 जानेवारी मकरसंक्रांत, 15 जानेवारी मतदान, 16 जानेवारी मतमोजणी, त्यानंतर शनिवार आणि रविवार अशा परिस्थितीत अनेक शाळांना सलग 5 दिवस सुट्टी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे 14 जानेवारीपासून शाळा थेट पुढील सोमवारी सुरू होऊ शकतात.
दरम्यान, 16 जानेवारी रोजी मतमोजणीच्या दिवशी शाळांना अधिकृत सुट्टी जाहीर होते का, याकडे शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

