(मुंबई)
पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी गुजरातप्रमाणे १५ ऑगस्टपर्यंत वाढवावा, अशी मागणी इंडियन वेस्ट कोस्ट फिशरमेन फेडरेशनच्या महाराष्ट्र आणि गुजरातमधील शिष्टमंडळाने राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्याकडे केली. मंत्रालयात झालेल्या बैठकीत ही मागणी करण्यात आली, अशी माहिती फेडरेशनचे कार्यवाह विनोद पाटील यांनी दिली.
गुजरातमध्ये सध्या १ जून ते १५ ऑगस्टदरम्यान मासेमारी बंदी असते. त्यामुळे मासळी साठ्यात वाढ झाली असून शाश्वत मासेमारीला चालना मिळत असल्याचं निरीक्षण मच्छीमार बांधवांनी मांडलं. त्यामुळे महाराष्ट्रातही बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढवावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
मच्छीमारांनी सांगितले की, ऑगस्टच्या पहिल्या दोन आठवड्यांत समुद्रात वादळी वारे आणि उधळलेले पाणी यामुळे जीवितहानी आणि बोटींना नुकसान होण्याचा मोठा धोका असतो. त्यामुळे बंदीचा कालावधी वाढवणं आवश्यक आहे, अशी त्यांची भूमिका आहे.
या मागणीबाबत मंत्री नितेश राणे यांनी सकारात्मक भूमिका घेतली. त्यांनी सांगितले की, “मागणी योग्य आहे. मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव सादर करणार आहे.” याशिवाय, गुजरातप्रमाणेच महाराष्ट्रातही ही अंमलबजावणी करण्यासाठी पुढील पावले उचलण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. राणे यांनी पुढे सांगितले की, पुढील आठवड्यात गुजरात व महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री आणि पारंपरिक मच्छीमारांचे शिष्टमंडळ केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री यांची भेट घेणार आहे. पश्चिम किनारपट्टीवर एकसंध धोरण तयार करून, पुढील वर्षीपासून १५ मे ते १५ ऑगस्टदरम्यान मासेमारी बंदी लागू करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
यावेळी झालेल्या चर्चेत अवैध मासेमारी करणाऱ्या नौकांचे परवाने वर्षभरासाठी रद्द करणे आणि कागदपत्र नसलेल्या बोटी नष्ट करण्यासंदर्भातही चर्चा झाली. संबंधित कायद्यात आवश्यक तरतुदी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहील, असंही मंत्री राणे यांनी स्पष्ट केलं.