(मुंबई)
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांसाठी दिलासादायक बातमी आहे. ई-केवायसी प्रक्रियेमुळे थांबलेले नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचे हप्ते एकत्र देण्याचा निर्णय महिला व बालविकास विभागाने घेतला आहे. त्यामुळे पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात थेट ४५०० रुपये जमा होणार आहेत.
ई-केवायसीमुळे थांबले होते हप्ते
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत दरमहा १५०० रुपयांची थेट आर्थिक मदत महिलांना दिली जाते. मात्र, ई-केवायसी पूर्ण न झाल्याने अनेक लाभार्थी महिलांचे हप्ते थांबले होते. काही महिलांनी ई-केवायसी करूनही पैसे न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली होती. काही ठिकाणी महिलांनी रस्त्यावर उतरून आंदोलनही केले होते.
या तक्रारींची दखल घेत महिला व बालविकास विभागाने संबंधित महिलांच्या घरी जाऊन पडताळणी करण्याचे आदेश दिले. तसेच नियम व अटी डावलून सादर झालेल्या अर्जांची सखोल तपासणी सुरू करण्यात आली आहे.
कोणाला किती पैसे मिळणार?
सरकारच्या निर्णयानुसार, ज्यांचे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे हप्ते थकले होते, त्यांना ४५०० रुपये एकत्र मिळणार आहेत. ज्यांना आधीच दोन महिन्यांचे हप्ते मिळाले आहेत, त्यांना जानेवारीचा एकच १५०० रुपयांचा हप्ता जमा होणार आहे. यामुळे अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.
मासिक हप्ता २१०० रुपये होणार?
दरम्यान, लाडकी बहीण योजनेचा मासिक हप्ता १५०० रुपयांवरून २१०० रुपये करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उदय सामंत यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान याबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. हा निर्णय प्रत्यक्षात आल्यास राज्यातील लाखो महिलांना आणखी मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.
एकूणच, थकलेले हप्ते एकत्र देण्याचा निर्णय आणि भविष्यातील वाढीची शक्यता यामुळे लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली असून, लाभार्थी महिलांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

