(पुणे)
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने मंगळवारी (३ फेब्रुवारी) शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटीचा निकाल जाहीर केला. यंदाच्या निकालात अत्यंत निराशाजनक चित्र समोर आले असून तब्बल ४ लाख ४६ हजार ७३० परीक्षार्थींमधून केवळ ५० हजार ३६९ उमेदवार (११.२८ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. उर्वरित ३ लाख ९६ हजार ३२५ परीक्षार्थी नापास झाले आहेत.
या निकालामुळे भावी शिक्षकांसह कार्यरत शिक्षकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर टीईटी अनिवार्य झाल्याने राज्यातील दीड लाखांहून अधिक शिक्षकांच्या नोकरीवर टांगती तलवार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शिक्षक अस्वस्थ
सर्वोच्च न्यायालयाने १ सप्टेंबर २०२५ रोजी दिलेल्या निकालानुसार इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांना ठराविक कालावधीत टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. या निर्णयाच्या पुनर्विचारासाठी शिक्षक संघटनांनी राज्य सरकारकडे मागणी केली, आंदोलनेही झाली. मात्र राज्य सरकारला अशी याचिका दाखल करण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट झाले.
आता शिक्षकांना केंद्र सरकारकडून काही दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे. मात्र तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई अटळ मानली जात आहे.
५३ वर्षांपर्यंतच्या शिक्षकांनाही टीईटी सक्तीची
महत्त्वाची बाब म्हणजे सध्या ५३ वर्षांपर्यंत वय असलेल्या शिक्षकांनाही टीईटी परीक्षा द्यावी लागणार आहे. दोन वर्षांच्या कालावधीत टीईटी उत्तीर्ण न झाल्यास सक्तीची सेवानिवृत्ती दिली जाणार आहे. त्यामुळे २३ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या टीईटी परीक्षेला राज्यभरातील ५० हजारांहून अधिक कार्यरत शिक्षक बसले होते. त्यापैकी मोठ्या संख्येने शिक्षक अपयशी ठरले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत असून, या काळात केंद्र व राज्याच्या माध्यमातून आणखी चार टीईटी परीक्षा होणार आहेत. संबंधित शिक्षकांना यापैकी कोणत्यातरी परीक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.
टीईटी निकालाचा आढावा
पेपर एक
-
एकूण परीक्षार्थी : १,९०,९०१
-
उत्तीर्ण : २१,८९२
-
अनुत्तीर्ण : १,६८,९९३
पेपर दोन
-
एकूण परीक्षार्थी : २,५५,८२९
-
उत्तीर्ण : २८,४७७
-
अनुत्तीर्ण : २,२७,३३२
पेपर एक : विषय व माध्यमनिहाय उत्तीर्णतेचे प्रमाण
-
मराठी : १२.०२ टक्के
-
इंग्रजी : ५.४४ टक्के
-
उर्दू : ६.९६ टक्के
-
हिंदी : १२.१९ टक्के
-
कन्नड : १५.०१ टक्के
-
बंगाली : ७.२९ टक्के
-
तेलुगू : १० टक्के
-
गुजराती : ३.७ टक्के
पेपर दोन (गणित व विज्ञान)
-
मराठी : ८.२९ टक्के
-
इंग्रजी : ५.८७ टक्के
-
उर्दू : ३.३४ टक्के
-
हिंदी : १७ टक्के
-
बंगाली : २२.२२ टक्के
-
कन्नड : ७.९८ टक्के
-
तेलुगू, गुजराती : ० टक्के
पेपर दोन (सामाजिकशास्त्र)
-
मराठी : ९.८१ टक्के
-
इंग्रजी : ६.२० टक्के
-
उर्दू : ३.३३ टक्के
-
हिंदी : २२.२९ टक्के
-
बंगाली : ११.९० टक्के
-
कन्नड : ८.४१ टक्के
-
तेलुगू : ० टक्के
-
गुजराती : ५.८८ टक्के
३६ उमेदवारांचा निकाल राखीव
टीईटीमध्ये गुण वाढवून देऊन उत्तीर्ण करून देण्याच्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. या प्रकरणी कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाच्या चौकशीदरम्यान ३६ संशयित उमेदवारांचे निकाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने राखून ठेवले आहेत. यामध्ये पेपर एकचे १६ आणि पेपर दोनचे २० उमेदवार आहेत.
आजवर शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण होण्याचे सरासरी प्रमाण केवळ ३.५ टक्के इतकेच राहिले आहे. आतापर्यंतचा सर्वाधिक निकाल २०१८ मध्ये ५.१३ टक्के लागला होता, तर त्याआधी २०१३ मध्ये ५.०२ टक्के निकाल नोंदवला गेला होता. उर्वरित वर्षांमध्ये टीईटीचा निकाल प्रामुख्याने २.३ टक्क्यांपासून ३.७० टक्क्यांपर्यंतच मर्यादित राहिला आहे.
दरम्यान, २०१८ आणि २०१९ मध्ये झालेल्या टीईटी परीक्षांतील गैरप्रकारांमध्ये सहभागी असलेल्या ९ हजार ५३७ उमेदवारांची पात्रता रद्द करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर यंदाच्या टीईटी परीक्षेचा निकाल थेट ११.२८ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने तो लक्षणीय वाढ झालेला मानला जात आहे.
टीईटी पात्रता ही आता केवळ नोकरीसाठीच नव्हे, तर पदोन्नतीसाठीही अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा टीईटीसाठी नोंदणी करणाऱ्या उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. याशिवाय टीईटीसंदर्भातील प्रशिक्षण व मार्गदर्शन सुविधांमध्येही वाढ झाल्याचा सकारात्मक परिणाम परीक्षेच्या निकालावर दिसून आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी दिली.
दरम्यान, एका प्रश्नाच्या उत्तरावर अनेक उमेदवारांनी आक्षेप नोंदवला असून, त्यावरचा अंतिम निर्णय काही दिवसांत जाहीर केला जाणार आहे. टीईटीचा हा निकाल केवळ परीक्षार्थीच नव्हे, तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेसाठी गंभीर इशारा मानला जात असून पुढील धोरणात्मक निर्णयांकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

