(पुणे)
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आंदोलनाची ठिणगी पेटली असून, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आगामी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत भव्य मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. “ही लढाई शेवटची असेल. आरक्षण मिळाल्याशिवाय आता माघार नाही,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. वाघोली (पुणे) येथे मुंबई मोर्चासाठी आयोजित कार्यकर्त्यांच्या तयारी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या आंदोलनाचा पुढचा तपशील मांडला.
अंतरवली ते आझाद मैदान; ऐतिहासिक यात्रा
“हा मोर्चा अंतरवली येथून सुरू होईल. त्यानंतर आम्ही थेट शिवनेरी किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करू. गडाची माती कपाळाला लावून कल्याणमार्गे हा मोर्चा आझाद मैदान (मुंबई) गाठणार आहे, कोट्यवधी मराठा बांधव या मोर्चात सहभागी होणार असून, हे आंदोलन केवळ आरक्षणासाठी नव्हे तर स्वाभिमानासाठी असेल,” अशी माहिती जरांगे पाटील यांनी दिली.
सरकारनं वारंवार फसवलं
गेल्या दीड वर्षांपासून केवळ चर्चाच होत असल्याचं त्यांनी स्पष्ट करत, सरकारवर फसवणुकीचा आरोप केला. “ज्या मराठ्यांच्या ताकदीवर तुम्ही सत्तेवर आलात, त्याच मराठ्यांच्या प्रश्नांवर चर्चेसाठी वेळ नाही? सरकारला गरीब मराठ्यांची भाषा समजत नाही. आम्ही शांततेच्या मार्गाने वाट पाहिली, आता मात्र निर्णय घेण्याची वेळ आली आहे,” असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला. ही शेवटची लढाई असेल. आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही. आता कोणतीही चर्चा नको – थेट आरक्षण हवं. मुंबईवर मोर्चा धडकणार आणि आम्ही आरक्षण घेऊनच परतणार,” असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

