( मुंबई )
विक्रोळीच्या पार्कसाईट परिसरातील जनकल्याण सोसायटीच्या आवारात मध्यरात्री दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत वडील आणि मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, घरातील आणखी दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही दुर्घटना गुरुवार आणि शुक्रवारी (१५ ऑगस्टच्या रात्री) झालेल्या मुसळधार पावसामुळे घडली. विक्रोळीच्या डोंगर उतारावर असलेल्या पार्कसाईट परिसरात अनेक झोपड्या आणि लहान घरं एकमेकांलगत बांधण्यात आली आहेत. या ठिकाणी रात्रभर पाऊस सुरू होता आणि मध्यरात्री १ ते १.३० च्या दरम्यान दरड कोसळली.
दरड कोसळल्याचा आवाज इतका अचानक आणि जोरदार होता की झोपेत असलेल्यांना सुटण्याची संधीही मिळाली नाही. यामध्ये मिश्रा कुटुंबातील शालू मिश्रा (वय १९) आणि सुरेश मिश्रा (वय ५०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर आरती मिश्रा आणि ऋतुराज मिश्रा गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आज जन्माष्टमीचा सण, एक आनंदाचा आणि शुभ दिवस असतानाच या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मृत्यूमुखी पडलेले शालू आणि सुरेश हे वडील-मुलगी असून, त्यांचा अचानक मृत्यू कुटुंबासाठी शोकाकुल ठरला आहे. स्थानिक प्रशासन, अग्निशामक दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले असून, ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकलं आहे का, याची पाहणी सुरू आहे.
या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी वारंवार प्रशासनाकडे डोंगर उतारावरील घरांच्या सुरक्षेबाबत मागणी केली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

