(मुंबई / रामदास गमरे)
“फोटोफ्रेममध्ये शांत, ध्यानमग्न अवस्थेतील तथागत बुद्ध आपण जसेच्या तसे स्वीकारले, मात्र त्यांच्या विचारांचा खरा अर्थ आपण समजून घेतलेला नाही. परिणामी, नवीन पिढीपासून खरे बुद्ध आणि त्यांची वैचारिक परंपरा दूरच राहिली आहे,” असे स्पष्ट मत प्रा. प्रतीक पवार यांनी मांडले. “आंबेडकरी चळवळीतील तरुणांची दिशा आणि धम्म” या विषयावर बोलताना ते वर्षावास प्रवचन मालिकेचे प्रमुख व्याख्याते या नात्याने उपस्थित होते.
प्रा. पवार पुढे म्हणाले, “चित्रकार बुद्धाचे चित्र त्यांच्या दृष्टिकोनातून रेखाटतो. पण आपण त्यालाच अंतिम मानून कट्टरपंथी भूमिका घेतो. त्यामुळे मनात द्वेष आणि संघर्ष निर्माण होतो. बुद्ध हे मोक्षदायी नव्हे, तर मार्गदर्शक होते. त्यांनी अनेकांना आदर्श माणूस घडवले. आपणही त्याच विचारांची कास धरली पाहिजे. चळवळीचा हेतू आणि दिशा काळानुसार बदलायला हवी. शिक्षणाच्या माध्यमातून तरुणांना खरे बुद्ध समजावून सांगून त्यांना उज्वल भविष्यासाठी तयार केलं पाहिजे.”
बौद्धजन पंचायत समिती संलग्न संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षावास प्रवचन मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. या मालिकेतील तिसरे पुष्प डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, परेल (मुंबई-१२) येथे सरसेनानी सभापती आनंदराज आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर बा. मोरे यांनी त्यांच्या प्रभावी शैलीत केले. तर संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश पवार यांनी पाहुण्यांची ओळख करून देत, स्मारक निधीकरिता बौद्धाचार्य व नागरिकांनी सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन केले. त्यांनी समितीच्या श्रावक-श्राविकांसाठी आयोजित श्रामनेर शिबिरासाठी नावनोंदणी करण्याचेही आवाहन केले.
सभापती आनंदराज आंबेडकर यांचे मार्गदर्शन
अध्यक्षीय भाषणात आनंदराज आंबेडकर यांनी शिक्षण क्षेत्रातील असमतोलावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “मी जेव्हा बार्टी येथील पीएच.डी. विद्यार्थ्यांच्या फेलोशिपसाठी पाठपुरावा केला, तेव्हा विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील ६०० विद्यार्थी आढळले, परंतु कोकणातून एकही नव्हता. यावरून कोकणातील मागासलेपण स्पष्ट होते. आपण संकुचित विचारांच्या पलीकडे जाऊन मुलांना उच्च शिक्षण देऊन त्यांना उच्च पदांवर पाठवले पाहिजे. कोकणातील विद्यार्थ्यांनीही इतर भागांप्रमाणेच शिक्षणात भरारी घेतली पाहिजे.”
या कार्यक्रमाला बौद्धजन पंचायत समितीचे सरचिटणीस राजेश घाडगे, कोषाध्यक्ष नागसेन गमरे, उपाध्यक्ष एच. आर. पवार, मनोहर मोरे, चंद्रमनी तांबे, श्रीधर साळवी, विठ्ठल जाधव, प्रकाश करूळेकर, यशवंत कदम, सिद्धार्थ कांबळे, राजाभाऊ ऊर्फ रामदास गमरे, तुकाराम घाडगे, अतुल साळवी, चिंतामणी जाधव, महेंद्र पवार, सुशीलाताई जाधव, विश्वस्त मंडळ, मध्यवर्ती कार्यकारिणी, विविध शाखांचे पदाधिकारी, महिला मंडळ, बौद्धाचार्य, बौद्धाचार्या व अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी दिवंगत बौद्धाचार्यांना साश्रुनयनांनी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शेवटच्या सत्रात मनोहर बा. मोरे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतलेल्या सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.