( मुंबई )
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. यावेळी कारण ठरले आहे ‘जंगली रमी’ या ऑनलाइन गेमच्या जाहिरातीचा व्हिडिओ, जो त्यांच्या मोबाईलवर विधानसभेच्या हाऊसमध्ये पाहिल्याचा आरोप करण्यात आला. सोशल मीडियावर या संदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कोकाटे यांना ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. यावर त्यांनी स्पष्ट भूमिका घेत स्पष्टीकरण दिले आहे.
जाहिरात स्किप करत होतो, पण…
“हाऊसच्या वरच्या मजल्यावरील काम संपल्यानंतर, खालच्या हाऊसमध्ये काय सुरू आहे ते पाहण्यासाठी मी युट्यूब उघडलं. त्यावेळी ‘जंगली रमी’ची जाहिरात आली. ती मी स्किप करणार होतो, पण दोन-चार सेकंद जास्त लागले. तोच क्षण कोणीतरी कॅमेऱ्यात टिपला,” असे स्पष्टीकरण कोकाटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. ते पुढे म्हणाले, “जाहिरात कशी स्किप करायची हे मला माहीत नव्हतं. व्हिडिओ कोणीतरी मुद्दाम काढला असावा. मात्र, याला फार महत्त्व देण्याची गरज नाही.”
याप्रकरणावरून आमदार रोहित पवार यांनी कोकाटेंवर टीका केली होती. यावर प्रत्युत्तर देताना कोकाटे म्हणाले, “फक्त रोहित पवारांना शेतकऱ्यांची काळजी आहे का? आम्हालाही आहे. मी शेतकऱ्यांविरोधात कोणतेही वक्तव्य केलेले नाही. मी केलेल्या कामांवर कोणी बोलत नाही. फक्त मोबाईल, कपडे आणि गाडीवरून टीका होते. जंगली रमीच्या जाहिराती सर्वांनाच येतात. रोहित पवारांच्या मोबाईलवरही येत असतील. कोणत्या गोष्टींचं भांडवल करावं, हे त्यांना समजायला हवं,” असा टोला त्यांनी लगावला.
कोकाटे यांनी विरोधी पक्षावर आरोप करत म्हटले, “विधानसभेत सरकारकडून चांगलं काम केलं जात आहे. विरोधकांकडे टीका करण्याशिवाय काहीही उरलेलं नाही. त्यांना हे माहित आहे की, सरकारमध्ये आता त्यांचं स्थान राहिलेलं नाही. त्यामुळे मंत्र्यांची बदनामी करण्यासाठी अशा गोष्टींना मुद्दाम हवा दिली जाते. माझं काम पारदर्शक आहे. विधानसभेच्या नियमांची मला पूर्ण जाणीव आहे. सभागृहात कॅमेरे असतात, हे मला ठाऊक आहे. त्यामुळे अशा कृती मी जाणूनबुजून करणार नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं.