(लोणावळा )
लोणावळ्यातील टायगर पॉइंट येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने वैवाहिक तणावाचे गंभीर परिणाम पुन्हा एकदा समोर आणले आहेत. पत्नीशी सुरू असलेल्या वादामुळे नैराश्यात गेलेल्या 30 वर्षीय विरेंद्र सिन्हा यांनी सुमारे 200 ते 250 फूट खोल दरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
विरेंद्र यांनी गुरुवारी (१२ फेब्रुवारी) पहाटेच्या सुमारास त्यांची चारचाकी गाडी लायन्स पॉइंट येथे संशयास्पद स्थितीत उभी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तपासात असे समोर आले की, आत्महत्या करण्यापूर्वी विरेंद्र यांनी आपल्या पत्नीला आणि मित्रांना ई-मेल आणि मेसेजद्वारे काही टोकाचे संकेत दिले होते.
विरेंद्र सिन्हा हे मूळचे पश्चिम बंगालचे रहिवासी होते. ते सध्या हिंजवडी येथे एका कंटेनर विक्री करणाऱ्या कंपनीत सेल्स विभागात कार्यरत होते. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद सुरू होते. 7 फेब्रुवारी रोजी दोघांमध्ये तीव्र भांडण झाले, त्यानंतर 10 फेब्रुवारीला पत्नी माहेरी निघून गेली.
13 फेब्रुवारी रोजी पत्नीचा वाढदिवस होता. त्या दिवशी मध्यरात्रीपासून विरेंद्र यांनी पत्नीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र मोबाईल नंबर ब्लॉक केल्यामुळे संवाद होऊ शकला नाही. पहाटे 5 ते 6 वाजण्याच्या सुमारास त्यांनी पत्नीला मेसेज आणि व्हिडिओ पाठवत आत्महत्येचा इशारा दिल्याची माहिती समोर आली आहे. पत्नीने तात्काळ संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक बचाव पथक शिवदुर्ग लोणावळा मित्र यांनी घटनास्थळी धाव घेत दरीतून मृतदेह बाहेर काढला. अवघ्या तीन वर्षांपूर्वी विवाह झालेल्या या दांपत्याच्या आयुष्यातील हा शेवट अत्यंत दुर्दैवी ठरला.
मानसिक आरोग्य तज्ज्ञांच्या मते, वैवाहिक वाद, नैराश्य आणि मानसिक ताण याकडे वेळेत लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. संवाद तुटणे हा अनेकदा संकटाचा पहिला टप्पा ठरतो. अशा प्रसंगी समुपदेशन, कुटुंबीयांचा आधार आणि मानसिक आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे अनेकांचे जीवन वाचवू शकते.
टीप: तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी मानसिक तणावात असाल, तर तात्काळ जवळच्या व्यक्तीशी, समुपदेशकाशी किंवा अधिकृत हेल्पलाइनशी संपर्क साधा. मदत मागणे ही कमजोरी नसून गरज आहे.

