(जैतापूर / राजन लाड)
साखरीनाटे ग्रामपंचायतीमध्ये ‘महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान’ अंतर्गत स्थापन झालेली तंटामुक्त समिती आज पूर्णपणे निष्क्रिय अवस्थेत आहे. समितीच्या स्थापनेपासून आजपर्यंत एकही अधिकृत बैठक झाली नसल्याचे स्पष्ट झाले असून, गावकऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेण्याची कोणतीही प्रणाली अस्तित्वात नाही. यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे. “ही समिती केवळ नावापुरतीच आहे. प्रत्यक्षात काहीच कार्यरत नाही. आमच्या प्रश्नांसाठी आम्ही कुणाकडे जावं?” असा प्रश्न संतप्त ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
योजना चांगली, पण अंमलबजावणी नाही
समितीच्या स्थापनेवेळी काही प्रमाणात हालचाल दिसून आली होती. मात्र, “आमच्याकडे स्पष्ट अधिकारच नाहीत,” असे सांगत अनेक सदस्यांनी हात वर केले. परिणामी, समितीकडे कोणीही तक्रार घेऊन जात नाही. ज्या काही चर्चा होतात त्या अनौपचारिक स्वरूपाच्या असून, लेखी इतिवृत्त, ठराव किंवा निर्णयाचा कुठलाही ठसा नाही.
राजापूर तालुक्यातील अनेक गावांमध्येही हेच चित्र
साखरीनाटेची स्थिती अपवाद नाही. राजापूर तालुक्यातील इतर अनेक गावांमध्येही तंटामुक्त समित्या निष्क्रिय असल्याचे आढळले आहे. बैठकांची नियमितता, गावकऱ्यांचा सहभाग, आणि तक्रारींच्या निवारणासाठी आवश्यक कार्यवाही यांचा संपूर्ण अभाव आहे. वाद झाल्यास ग्रामस्थ तंटामुक्त समितीकडे जाण्याऐवजी थेट सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक किंवा पोलीस ठाण्याकडे तक्रार दाखल करत आहेत. काही प्रकरणांत तर लोकांनी थेट न्यायालयाचा मार्गही अवलंबला आहे, जो टाळण्यासाठीच ही समिती स्थापन करण्यात आली होती.
ग्रामस्थांचा सवाल: ही समिती आहे तरी कशासाठी?
“आम्ही निवडून दिलं, पण त्यांना ना अधिकार आहेत, ना बैठक, ना निर्णय. मग अशा समितीचा उपयोग तरी काय?” असा थेट सवाल ग्रामस्थांनी केला आहे. तंटामुक्त समित्यांचा उद्देश निश्चितच सकारात्मक आहे. मात्र, तो यशस्वी करण्यासाठी सदस्यांचे प्रशिक्षण, स्पष्ट अधिकार, आवश्यक निधी, आणि ग्रामसभेची जबाबदारी निश्चित करणं आवश्यक आहे, अशी जोरदार मागणी साखरीनाटे व आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांकडून होत आहे.

