(राजापूर)
राजापूर तालुक्यात पत्रकार सिद्धेश मराठे यांच्यावर झालेल्या हल्ल्याची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करावी, अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा काँग्रेसने दिला आहे. या मागणीचे निवेदन काँग्रेस तालुकाध्यक्ष जितेंद्र खामकर यांनी राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्याकडे दिले. या घटनेचा काँग्रेसच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, राजापूर नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर शहरात आणि परिसरात धाकधपटशाहीचे प्रकार वाढले असून, अशा घटना सुसंस्कृत राजापूर तालुक्याच्या परंपरेला काळीमा फासणाऱ्या आहेत. पत्रकारांवर होणारे हल्ले लोकशाहीसाठी गंभीर बाब असून, अशा प्रकारांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही, असेही काँग्रेसने स्पष्ट केले.
या प्रकरणाची कसून चौकशी करून संबंधित गुन्हेगारांना तातडीने ताब्यात घ्यावे, तसेच हल्ल्यात वापरलेली वाहने तपासात घ्यावीत, अशी ठाम मागणी काँग्रेसने केली आहे. मागण्यांची पूर्तता न झाल्यास काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र उपोषण किंवा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष अॅड. हुस्नबानू खलिफे, नगरसेवक अॅड. जमीर खलिफे, राजापूर अर्बन बँकेच्या संचालिका सौ. अनामिका जाधव, काँग्रेस शहराध्यक्ष अजीम जैतापकर, हारूण साठी, संतोष सातोसे, राजापूर तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी संचालक वसंत आंबेलकर यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नगरसेवक उपस्थित होते.

