(राजापूर)
रिक्षा स्टँडवर व्यवसाय करण्यास मज्जाव केल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या एका रिक्षाचालकाने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी राजापूरच्या जवाहर चौकात घडली. नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला.
घटनेची माहिती अशी की, शहरालगतच्या गावातील एका तरुणाने आठवड्याभरापूर्वी बँकेकडून कर्ज घेऊन नव्याने रिक्षा घेतली होती. त्याने ही रिक्षा व्यवसायासाठी राजापूरच्या जवाहर चौकातील रिक्षा स्टँडवर उभी केली. मात्र, तेथील काही रिक्षा संघटनांनी त्याला तिथे व्यवसाय करण्यास मज्जाव केला. या सातत्याने होणाऱ्या विरोधामुळे मानसिक तणावाखाली असलेल्या तरुणाने सोमवारी सकाळी सुमारास अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी प्रसंगावधान राखून तत्काळ राजापूर पोलिसांना याची माहिती दिली. काही मिनिटांतच पोलिस निरीक्षक अमित यादव यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले व संबंधित तरुणाला समजूत घालत राजापूर पोलिस स्थानकात नेले.
या संदर्भात बोलताना पोलिस निरीक्षक अमित यादव म्हणाले, “सदर रिक्षाचालकाला समज देण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात आहे. त्याच्याशी सविस्तर संवाद साधून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.”
दरम्यान, नव्याने रिक्षा घेतलेल्या तरुणाला सातत्याने व्यवसायास अडथळा येत असल्याने त्याने टोकाचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली असून संबंधित संघटनांवर चौकशीची मागणी होत आहे.