(राजापूर / तुषार पाचलकर)
पाचल शिक्षण मंडळ संचलित सरस्वती विद्या मंदिर, पाचल येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र आणि सरस्वती विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने कनिष्ठ महाविद्यालयीन तसेच माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत जिजाऊ संस्थेचे प्रकल्प संचालक प्रा. संदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअर संधींबाबत सखोल मार्गदर्शन केले.
बारावीनंतर उपलब्ध असलेल्या स्टाफ सिलेक्शन कमिशन, इंडियन पॅरामिलिटरी फोर्स, एनडीए यांसारख्या विविध क्षेत्रांतील संधींची माहिती त्यांनी दिली. तसेच या क्षेत्रांसाठी आवश्यक कौशल्ये, अभ्यासाची योग्य रणनीती आणि तयारी कशी करावी यावर त्यांनी सविस्तर प्रकाश टाकला.
माध्यमिक शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून परिश्रम, सातत्य आणि चिकाटीच्या जोरावर यश मिळवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव श्री. रामचंद्र वरेकर, सहसचिव श्री. किशोरभाई नारकर, मुख्याध्यापिका श्रीमती आशा गुरखे, पर्यवेक्षिका श्रीमती प्रमिला गांधी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेतील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

