- (राजापूर / तुषार पाचलकर)
रत्नागिरी जिल्ह्यातील स्मार्ट ग्रामपंचायत पुरस्कार प्राप्त पाचल ग्रामपंचायतीत १४ जुलै रोजी सकाळी एक धक्कादायक प्रकार घडला. ग्रामपंचायतीचे उपसरपंच आत्माराम सुतार यांनी कार्यालयातील कर्मचारी सुभाष काळे यांना कानशिलात लगावल्याचा आणि अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सुभाष काळे यांनी पाचल ग्रामपंचायत कार्यालयात आणि राजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, सुभाष काळे कार्यालयात असताना स्ट्रीट लाईट विषयावर उपसरपंचांसोबत चर्चा सुरू होती. दरम्यान, शिवीगाळीचा जाब विचारल्यावर आत्माराम सुतार यांनी अचानक कानशिलात लगावत अश्लील भाषा वापरली. त्या वेळी अन्य कर्मचारीही उपस्थित होते.
पूर्वीही अश्लील शिवीगाळ, जातीवाचक अपमानाचे आरोप
सुभाष काळे यांनी तक्रारीत नमूद केलं आहे की, १२ जुलै रोजी सायंकाळी कामासंदर्भात फोनवर बोलत असताना देखील उपसरपंच सुतार यांनी त्यांच्यावर अत्यंत अश्लील आणि अपमानास्पद भाषेत शिवीगाळ केली होती. त्याविषयी विचारणा केल्यावरच कार्यालयात मारहाण झाल्याचा दावा त्यांनी केला.
तक्रारीमध्ये त्यांनी जातीवाचक अपमानाचे गंभीर आरोप करत म्हटले आहे की, “तुमची …. लायकी काय आहे? दीड दमडीचा तू, तुझ्यासारखे पन्नास नोकर माझ्याकडे आहेत,” अशा प्रकारचे वक्तव्य उपसरपंच सुतार वारंवार करतात.
या प्रकारामुळे मानसिक त्रास सहन करावा लागत असून, यापुढेही अशी वागणूक सहन करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे
उपसरपंच आत्माराम सुतार यांच्यावरील हे पहिलेच प्रकरण नाही. यापूर्वी सदस्य असताना ग्रामपंचायतीच्या एका बैठकीदरम्यान त्यांनी सहकाऱ्यावर खुर्ची उगारल्याचा प्रकार घडल्याची माहितीही समोर आली आहे.
प्रशासनाकडून चौकशी सुरू
या प्रकरणावर अद्याप उपसरपंच आत्माराम सुतार यांचा अधिकृत प्रतिसाद मिळालेला नाही. दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांनी प्राथमिक चौकशी सुरू केली असून, पुढील कारवाईची प्रतीक्षा आहे.

