(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यासहित संपूर्ण कोकणात शिमग्यातून प्रसिद्ध असा “रोमट” हा प्रकार भाविक भक्तीभावाने साजरा करतात. रोमट हा कोकणातील सर्वसाधारण प्रकार खूप वर्षांपासून प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या गावात पद्धती फक्त वेगवेगळ्या असून तो एक शिमगोत्सवातील खेळाचा प्रकार आहे.
शिमगोत्सवामध्ये त्या त्या वाडीची जबाबदारी वाटून दिलेली असते. रोमट आणि शिमगोत्सव ही परंपरा राजापूर तालुक्यातील पाचल या गावी फार वर्षापासून सुरू आहे. पेठवाडीतील ग्रामस्थ मंडळीकडे रोमटाची जबाबदारी असते. रोमटची सुरवात ही पाचल शेजारी असणाऱ्या तळवडे गावातील बाजारवाडी येथून होते व पाचल पेठवडीतील मंडळी ते वाजत गाजत पाचल होळीचा मांड(नारकरवाडी) येथे घेऊन येतात. त्या मध्ये साहसी खेळ खेळले जातात यामध्ये प्रामुख्याने लाठीकाठीचा खेळ, बनाटी वगैरे असतात.
तळवडे येथून निघाल्यानंतर रोमट सर्वप्रथम पाचल येथील जुना चव्हाटा (बाजारवाडी) म्हणजेच चतुर्सिमेची होळी येथे भेट देऊन रोमट होळीच्या मांडाकडे मोठ्या उत्साहात रवाना होताना रोमट वाजत गाजत मोठ्या संख्येने होळीच्या मांडावर आणले जाते.
रात्री 12 वाजता गुरव मंडळी धुपारत दाखवतात आणि पालखी आणि रोमट यांची भेट होते. यामध्ये पालखी भेटवण्याचा मान मानकरी नारकर व तेलंग यांचा असतो. त्यावेळी पालखीतील ढोल आणि रोमटातील ढोल एकत्र येऊन नाचतात त्याला भेट म्हटली जाते. ही परंपरा पिढ्यान पिढ्या चालू आहे. पालखीच्या पहिल्या भेटीत रोमट भेटल्यावर मांडावर पालखी चार प्रदक्षिणा घालून खेळते. या रोमटा मध्ये गावकार ग्रामस्थ मोठ्या संख्येने आनंदात सहभागी होतात.
पाचल येथील रोमट दशक्रोशीमध्ये प्रसिद्ध असून याचा आनंद लुटण्यासाठी भाविक विविध ठिकाणाहून येत असतात. श्री केदारलिंग शिमगोत्सवाचा 12 दिवसाचा उत्सव विविध कार्यक्रमाने पारंपारिक वारसा जपत साजरा होतो.शिंपण्याने शिमगोत्सवाची सांगता होते.