(जैतापूर / वार्ताहर)
राजापूर तालुक्यातील मीठगव्हाणे येथील बँक ऑफ इंडिया शाखेला गेले तीन महिने व्यवस्थापक नाही. त्यामुळे या ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. कर्ज, एफडी, सबसिडी, खात्यांतील बदल अशा अनेक सेवांची कामे रखडल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत.
शाखेतील इतर कर्मचारी आपापल्या परीने सेवा देण्याचा आटोकाट प्रयत्न करत असले तरी व्यवस्थापकाच्या अनुपस्थितीत महत्त्वाची कामे प्रलंबित राहत आहेत. शेतकरी, महिला, वृद्ध आणि विद्यार्थ्यांसारख्या विविध घटकांना बँकेत वारंवार चकरा माराव्या लागत आहेत. या भागात आधीच नेटवर्क अडचणी, वाहतूक आणि वैद्यकीय सेवांचा अभाव आहे. त्यामुळे व्यवस्थापक पदासाठी अधिकारी होण्यास कोणीही इच्छुक नाही, अशी माहिती समजते.
“एवढ्या काळापासून जर शाखेत व्यवस्थापक नसेल, तर आमचं दैनंदिन बँकिंग कसं सुरळीत चालणार?” असा सवाल संतप्त ग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे. स्थानिक ग्रामस्थांनी आणि ग्राहकांनी याप्रकरणी शासन तसेच बँक प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. अन्यथा, ग्रामीण भागातील वित्तीय समावेशनाचे उद्दिष्ट धोक्यात येईल, अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

