(राजापूर)
शिवबा प्रतिष्ठान राजापूर यांच्या वतीने जवाहर चौक, राजापूर येथे ‘राजापूर श्री २०२६’ शरीरसौष्ठव स्पर्धेचे दिमाखात आयोजन करण्यात आले. स्पर्धेला मोठा प्रतिसाद लाभला. यामध्ये ‘रत्नागिरी जिल्हा श्री’चा किताब सुरेश भाताडे यांनी, तर ‘राजापूर तालुका श्री’चा किताब आदित्य शिवलकर यांनी पटकावला.
बॉडी बिल्डिंग अँड फिजिक्स स्पोर्ट्स असोसिएशन रत्नागिरी यांच्या मान्यतेने ही स्पर्धा सलग पाचव्या वर्षी आयोजित करण्यात आली. स्पर्धेची सुरुवात श्री देव चव्हाटा मंदिरात पूजन करून, छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण व मानवंदना देत फटाक्यांच्या आतषबाजीत करण्यात आली.
स्पर्धा तीन टप्प्यांत घेण्यात आली. पहिल्या टप्प्यात तालुकास्तरीय स्पर्धा, त्यानंतर लहान मुलांसाठी ‘लिटिल चॅम्प्स’ आणि शेवटी जिल्हास्तरीय स्पर्धा पार पडली. ‘लिटिल चॅम्प्स’ ही स्पर्धा विशेष आकर्षण ठरली. या गटात १५ लहान मुलांनी सहभाग घेतला होता. या मुलांना हर्षद मांडवकर यांनी प्रशिक्षण दिले.
तालुकास्तरीय स्पर्धेत आदित्य अविनाश शिवलकर (नगर परिषद जिम, राजापूर) यांनी तालुका किताब पटकावला. अभिनंदन सुधीर सातोपे (आरएसपीएम) यांनी दुसरा, फैजान रमीज मुल्ला यांनी तिसरा, दीपक वासुदेव पाटणकर यांनी चौथा तर विशाल रमेश गोंडाळ यांनी पाचवा क्रमांक मिळवला.
‘लिटिल चॅम्प्स’ गटात द्रोण संदीप चव्हाण यांनी प्रथम, तर अर्णव विजय गोंडाळ यांनी तृतीय क्रमांक पटकावला. लहान मुलांची शरीरसौष्ठव स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रात केवळ राजापूर येथेच नियमितपणे घेतली जाते, याबद्दल शिवबा प्रतिष्ठानचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.
जिल्हास्तरीय स्पर्धा पाच वजनगटांत झाली. ५५ ते ६०, ६० ते ६५, ६५ ते ७० आणि ७५ किलो वजनगटांत चुरस पाहायला मिळाली. यामध्ये सुरेश सत्यवान भाताडे (फिनिक्स जिम, रत्नागिरी) यांनी ‘रत्नागिरी जिल्हा श्री’चा किताब पटकावला. विनीत बेडेकर (आरएसपीएम जिम, राजापूर) यांना ‘उगवता तारा’, तर नैतिक सुदेश चव्हाण (आरएसपीएम, राजापूर) यांना ‘बेस्ट पोझर’ किताब देण्यात आला. सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.
या स्पर्धेस भाजप तालुका अध्यक्ष पश्चिम मोहन घुमे, पंचायत समिती सदस्य अभिजीत गुरव, नगरसेवक ॲड. जमीर खलिपे, सौरभ पेणकर, दिलीप चव्हाण, व्यापारी संघटना राजापूर तालुका अध्यक्ष संदीप मालपेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन जितेंद्र मालपेकर यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिवबा प्रतिष्ठान राजापूरच्या पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

