(रत्नागिरी / प्रतिनिधी)
कारवांचीवाडी येथील ग्रामीण पोलीस ठाण्याकडे जाणाऱ्या रस्तावर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. प्रत्येक काही मीटर अंतरावर मोठे खड्डे असून, रस्त्याने प्रवास करणे म्हणजे धाडस करण्यासारखे झाले आहे. दुचाकीच काय, चारचाकी वाहनांनाही या रस्त्याने जाणे कठीण बनले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कार्य करणाऱ्या पोलिस ठाण्याकडे जाणाऱ्या रस्त्याची ही दयनीय अवस्था म्हणजेच शासकीय उदासीनतेचे ताजे उदाहरण ठरत आहे.
येथील रस्त्यावर असलेले खड्डे आता काही दिवसांनी तळ्याचे स्वरूप घेतील. हा रस्ता केवळ स्थानिक रहिवाशांचाच नव्हे, तर परिसरातील अनेक गावांतील नागरिक, कर्मचारी यांच्यासाठी प्रमुख संपर्कमार्ग आहे. ग्रामीण पोलीस ठाण्याला लागूनच एक पेट्रोल पंप देखील आहे. मात्र रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनांचे हाल होत असून, अपघातांची शक्यता देखील वाढली आहे. पावसाळ्याच्या दिवसांत या खड्ड्यांमध्ये साठणारे पाणी हे धोकादायक सापळे ठरत असून, त्यामध्ये अनेक वेळा दुचाकीस्वार घसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. यापूर्वी या रस्त्यावर काम करणाऱ्या ठेकेदाराच्या कामाचा दर्जा आणि प्रशासनाच्या देखरेखीचा अभाव पुन्हा एकदा उघड झाला आहे. पावसाळा सुरु होताच रस्त्यावर खड्डे निर्माण झाल्याने तुटक्या डांबरी थराखालील निकृष्ट कामगिरीचा पर्दाफाश झाला आहे.
पोलीस ठाण्यापर्यंतचा रस्ता जर असा असेल, तर इतर भागांची काय अवस्था असेल? असा सवाल आता नागरिकांकडून थेट प्रशासनाला विचारला जात आहे. पोलिस ठाण्यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणाकडे जाणाऱ्या मार्गाची त्वरित दुरुस्ती करून नागरिकांचा जीव धोक्यातून वाचवण्याचे काम प्रशासनाने तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.