(राजापूर)
राजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका गंभीर घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात रत्नागिरी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना स्कॉर्पिओ वाहनासह घरफोडीचे साहित्य जप्त करून अटक केली आहे.
ही घरफोडीची घटना 23 नोव्हेंबर 2025 रोजी पहाटे 1.30 वाजण्याच्या सुमारास राजापूर तालुक्यातील कोळवणखडी (खालची मोरेवाडी) येथे घडली होती. फिर्यादी सदानंद शांताराम मोरे (वय 55) यांच्या घरात चार अज्ञात इसमांनी प्रवेश केला होता. दोन आरोपी किचनच्या खिडकीतून तर दोन मुख्य दरवाजातून घरात शिरले होते. आरोपींनी घरातील पैशांचा डब्बा चोरण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 217/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 305(अ) व 331(4) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करण्यात आली. स्थानिक सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे हा गुन्हा धाराशिव जिल्ह्यातील सुनील पवार आणि त्याच्या साथीदारांनी केल्याचे निष्पन्न झाले.
रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (LCB) आणि राजापूर पोलिसांच्या संयुक्त पथकाने धाराशिव व सोलापूर जिल्ह्यात आरोपींचा शोध सुरू केला. अखेर 21 डिसेंबर 2025 रोजी इंदापूर हायवेवर सापळा रचून सुनील भिमा पवार (वय 27, रा. मोहा, जि. धाराशिव), अजय उतरेश्वर गवळी (वय 20, रा. पिंपळवाडी, जि. धाराशिव) यांना ताब्यात घेण्यात आले.
प्राथमिक चौकशीत दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, या घरफोडीत सहभागी असलेल्या इतर दोन साथीदारांचीही ओळख पटली आहे. त्यांचा शोध सुरू असून, या प्रकरणाचा अधिक तपास राजापूर पोलीस करत आहेत. ही यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव आणि त्यांच्या पथकाने केली आहे.

