(लोटे)
खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील बँक ऑफ इंडिया शाखेत रविवारी सायंकाळी चोरट्याने तब्बल साडेचार तास थरार केला, मात्र रोकड हाती लागली नाही. अखेर त्याने लॅपटॉप, स्कॅनर, रोकड रक्कम ठेवण्यासाठी वापरण्यात येणारी सूटकेस आणि अन्य किरकोळ साहित्य चोरून घटनास्थळावरून पळ काढला.
शनिवार (दि. १२) आणि रविवार (दि. १३) बँकेच्या सलग सुट्यांचा फायदा घेत चोरट्याने रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता बँकेच्या मागील बाजूच्या खिडकीची लोखंडी जाळी तोडून प्रवेश केला. रात्री नऊ वाजेपर्यंत बँकेत शोधाशोध करून रोकड मिळवण्याचे त्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र काहीही रक्कम हाती न लागल्याने त्याने फक्त उपलब्ध वस्तूंवर समाधान मानले.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरट्याची हालचाल स्पष्टपणे दिसून येत आहे. त्याने लॅपटॉप, रोकड हाताळणीसाठी वापरण्यात येणारी सूटकेस, स्कॅनर व इतर काही साहित्य चोरले.
सोमवारी सकाळी कामकाजासाठी बँकेत आलेल्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही घटना आली. त्यानंतर लोटे पोलीस दूरक्षेत्रात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला आहे