(राजापूर / तुषार पाचलकर)
मुंबई गोवा महामार्गावर एका महिलेला लिप्ट देऊन डोक्यात लोखंडी रॉड घालुन तिला लुबाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या कार चालकाचा शोध घेण्यात पोलीसांना अद्याप यश आलेले नाही. तब्बल दोन दिवस उलटूनही या प्रकरणातील कार व त्या आरोपीचा शोध न लागल्याने तपासाचे मोठे आव्हान पोलीसांपुढे उभे ठाकले आहे. दरम्यान त्या महिलेने केलेल्या वर्णनानुसार पोलीसांनी त्या संशयीत आरोपीचे रेखाचित्र तयार केले असून त्या दृष्टीने पोलीसांनी तपास सुरू केल्याची माहिती पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी दिली. या प्रकरणी पोलीस कसून तपास करत असून वेगवेगळया चार टिम यावर काम करत आहेत. मात्र या प्रकारानंतर राजापुरात महिलांमध्ये काहीसे भितीचे वातावरण निर्माण झाले असून महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
दसऱ्याच्या दिवशी महामार्गावर कोदवली येथून राजापूरकडे येणाऱ्या रश्मी प्रभाकर चव्हाण या ६५ वर्षीय महिलेला राजापुरात सोडतो असे सांगून काय मध्ये बसवुन कार चालकाकडून तिला लुबाडण्याचा प्रकार घडला. सायंकाळी ६ ते ६.३० या वेळेत कोदवली ते हातिवले या दरम्यान हा प्रकार घडला. यात या महिलेच्या डोक्यात त्या कार चालकाने लोखंडी रॉड मारून तिला गंभीर जखमी केले व तिच्याकडील सुमारे ३३ हजाराचा ऐवज लांबविला आहे. तशी फिर्याद या महिलेने राजापुर पोलीसांना २ ऑक्टोबर रोजी नोंदविलेली आहे.
या घटनेनंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. ही महिला सध्या रत्नागिरीत खासगी रूग्णालयात उपचार घेत आहे. दरम्यान या घटनेनंतर पोलीसांनी महामार्गावरील काही हॉटेल, पेट्रोलपंप यांचे सीसीटीव्हीही तपासले आहेत. यात ती कार महामार्गावरून जात असल्याचेही दिसून आले आहे. महिलेनेही त्या कार चालकाचे वर्णन पोलीसांना सांगितले असून त्यावरून पोलीसांनी संशयीत आरोपीचे रेखाचित्र तयार केले आहे. त्यावरूनही पोलीस तपास करत आहेत. तर मोबाईल लोकेशनसह अन्य तांत्रिक तपासही पोलीस करत आहेत. मात्र दोन दिवस उलटले तरी या प्रकरणात काहीच धागेदोरे न सापडल्याने या गुन्हयाच्या तपासाचे आव्हान पोलीसांपुढे उभे आहे.
महामार्गावर सीसीटीव्हीची आवश्यकता अधोरेखित
मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम बहुतांश पुर्णत्वाला गेले आहे. मात्र महामार्गावर आवश्यक त्या सेवा सुविधांबाबत अद्यापही कोणतीच कार्यवाही होताना दिसत नाही.राजापुरात घडलेल्या या प्रकारानंतर महामार्गावर एकही सीसीटीव्ही नसल्याचे पुढे आले आहे, त्यामुळे या गुन्हयाच्या तपासातही पोलीसांना अडचणी येत असल्याचे पोलीसांचे म्हणणे आहे. महामार्गावर राजापूर एसटीडेपो, मोठा पुल, तसेच वाटूळ, ओणी, हातिवले अशा मध्यवर्ती ठिकाणी सीसीटीव्ही बसविणे आवश्यक आहे. जेणेकरून अशा प्रकारची घटना घडली तर त्याचा शोध घेणे सोपे होणार आहे. याबाबत लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

