(राजापूर /रत्नागिरी)
मानसिक अस्वस्थतेच्या अवस्थेत घरातून बाहेर पडलेल्या ६५ वर्षीय वृद्धेचा मृतदेह दुसऱ्या दिवशी बाकाळे समुद्रकिनाऱ्यावरील पाण्यात आढळून आल्याने राजापूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
दांडे-अणसुरे येथील गीतांजली गोरखनाथ पाटील (वय ६५) या १३ जून रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेल्या होत्या. कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला, मात्र रात्री उशिरापर्यंत त्या घरी परतल्या नाहीत. यानंतर त्यांचा मुलगा स्वप्नेश पाटील, दुसरा मुलगा सम्राट पाटील तसेच गावातील ग्रामस्थांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली. अखेर १४ जून रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास बाकाळे समुद्रकिनाऱ्याजवळील समुद्राच्या पाण्यात त्यांचा मृतदेह आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. पंचनामा व अन्य कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यात आला. या प्रकरणी बीएनएसएस कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे पाटील कुटुंबावर शोककळा पसरली असून दांडे-अणसुरे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय अहवालानंतर स्पष्ट होणार असले तरी प्राथमिक माहितीनुसार समुद्रात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

