(मुंबई)
जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन निर्माता टेस्ला इंक. ने अखेर भारतीय बाजारपेठेत अधिकृत प्रवेश करत आज मुंबईत आपले पहिले शोरूम सुरू केले. वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) मेकर मॅक्सिटी मॉलमध्ये उभारले गेलेले हे शोरूम भारतात टेस्लाच्या उपस्थितीचा प्रारंभ असून, याच ठिकाणी कंपनीने आपल्या लोकप्रिय मॉडेल Y इलेक्ट्रिक SUV चे लाँचिंग केले. या गाडीची किंमत ₹60 लाखांपासून सुरू होते. या अत्याधुनिक इलेक्ट्रिक कारनं भारतीय ग्राहकांचं लक्ष वेधलं असून, याची दोन व्हेरियंट्स- रिअर व्हील ड्राइव्ह (RWD) आणि लॉन्ग रेंज (LR) RWD – सध्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. टेस्लानं या कारच्या किंमती जाहीर केल्या असून, मॉडेल Y ची बुकिंग 22,000 रुपये भरून करता येईल. डिलिव्हरी 2025 च्या तिसऱ्या तिमाहीपासून (RWD) आणि चौथ्या तिमाहीपासून (LR) सुरू होणार आहे.
या शोरूमचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह टेस्लाचे वरिष्ठ अधिकारी, उद्योग व माध्यम क्षेत्रातील प्रतिनिधी आणि ग्राहक उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “टेस्लाचे भारतात आणि विशेषतः मुंबईत स्वागत करताना आनंद होत आहे. ही फक्त कार कंपनी नाही, तर नवकल्पना, डिझाइन आणि टिकाव यांचा संगम आहे. टेस्लामुळे देशात इलेक्ट्रिक वाहनांची संपूर्ण इकोसिस्टीम निर्माण होण्यास मदत होईल.” मुख्यमंत्री फडणवीस यांनी टेस्लाला भारतात संशोधन, विकास व उत्पादन केंद्र स्थापन करण्याचे आवाहन केले. “महाराष्ट्र टेस्लासोबत दीर्घकालीन भागीदारीस तयार असून, आम्ही टेस्लाला या प्रवासात भागीदार म्हणून पाहतो,” असे ते म्हणाले.
टेस्लाने भारतात मॉडेल Y चे दोन व्हेरिएंट्स लाँच केले आहेत. रियर-व्हील ड्राइव्ह व्हेरिएंटची किंमत ₹60.1 लाख असून, लाँग रेंज व्हेरिएंटची किंमत ₹67.8 लाख आहे. ही किंमती अमेरिकेसारख्या बाजारपेठेपेक्षा लक्षणीय अधिक आहेत. उदाहरणार्थ, याच मॉडेलची किंमत अमेरिकेत ₹38.6 लाख ($44,990), चीनमध्ये ₹31.5 लाख आणि जर्मनीमध्ये ₹46 लाख इतकी आहे. भारतातील प्रचंड आयात शुल्क व कररचना ही किंमतीतील तफावतीमागील प्रमुख कारणे आहेत.
भारतामध्ये टेस्लाच्या किमती किती?
व्हेरिएंट एक्स-शोरूम किंमत ऑन-रोड किंमत (सुमारे)
Model Y RWD ₹59.89 लाख ₹61.07 लाख
Model Y Long Range RWD ₹67.89 लाख ₹69.15 लाख. यामध्ये १८% GST, ₹५०,००० प्रशासन शुल्क व इतर चार्जेसचा समावेश आहे.
अमेरिकेत हीच कार फक्त ₹३८ लाखांना!
अमेरिकेत Model Y कारची किंमत फक्त ₹३८.६० लाख, चीनमध्ये ₹३१.५७ लाख तर जर्मनीमध्ये ₹४६.०९ लाखांपासून सुरू होते. भारतीय बाजारात तीच कार ३० लाखांहून अधिक महाग का ! तर त्यामागचं प्रमुख कारण म्हणजे भारतातील उच्च आयात शुल्क, शिपिंग खर्च आणि स्थानिक करप्रणाली असल्याचे सांगितले जाते.
टेस्ला Model Y ची वैशिष्ट्ये – आधुनिक तंत्रज्ञान
रेंज:
RWD व्हेरिएंट – ५०० किमी
Long Range RWD – ६२२ किमी (एका चार्जमध्ये)
बॅटरी पर्याय: ६० kWh आणि ७५ kWh
फिचर्स:
१५.४ इंच टचस्क्रीन
मागील प्रवाशांसाठी ८ इंची स्क्रीन
पॉवर अॅडजस्टेबल सीट्स
ड्युअल झोन AC
पॅनोरॅमिक सनरूफ
ऑटो रिअर लिफ्टगेट
१९ इंच क्रॉसफ्लो अलॉय व्हील्स
७ बाह्य रंग व २ इंटीरियर थीम
सेल्फ-ड्रायव्हिंग ऑप्शन:
अतिरिक्त ₹६ लाखांमध्ये उपलब्ध
मुंबईतील बीकेसीमध्ये उघडलेले हे शोरूम सुमारे ४,००० चौरस फूट आकाराचे आहे. टेस्लाने हे ठिकाण भाडे तत्वावर घेतले असून, दरमहा ₹३५ लाख इतके भाडे भरणार आहे. सुरुवातीला सर्व गाड्यांचे उत्पादन चीनमधील शांघाय gigafactory मध्ये होणार आहे व भारतात आयात केल्या जाणार आहेत. शोरूम सुरू करतानाच टेस्लाने भारतात सुपरचार्जर स्टेशनसाठी पायाभूत सुविधा उभारण्याचीही तयारी केली आहे. मुंबई व आजूबाजूच्या परिसरात हे चार्जिंग स्टेशन उभारले जाणार असून, त्यासाठी कंपनीने सुमारे $1 दशलक्ष (₹८.५ कोटी) गुंतवणूक केली आहे. गाडी खरेदीसोबतच ग्राहकांना आवश्यक अॅक्सेसरीज आणि विक्रीनंतरची सेवा देण्यासाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
भारत सरकार २०३० पर्यंत देशातील एकूण वाहन विक्रीपैकी किमान ३० टक्के ही इलेक्ट्रिक वाहनांची असावी, असे उद्दिष्ट ठेवून काम करत आहे. टाटा मोटर्स, महिंद्रा यांसारख्या देशी कंपन्यांनी या क्षेत्रात आधीच आघाडी घेतली असून, आता टेस्ला सारखी आंतरराष्ट्रीय कंपनी भारतात दाखल झाल्यामुळे ईव्ही सेगमेंटमध्ये स्पर्धा अधिकच वाढणार आहे. किंमती तुलनेने जास्त असल्या तरी टेस्ला सध्या भारतातील उच्चभ्रू शहरी ग्राहकांना लक्ष्य करत आहे. बीएमडब्ल्यू, मर्सिडीज-बेन्झ यांसारख्या प्रीमियम ब्रँड्सना टेस्ला थेट स्पर्धा देणार आहे. गाडीची डिझाईन, कामगिरी आणि ब्रँड व्हॅल्यू यामुळे ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता पाहायला मिळत आहे. टेस्लाच्या अधिकाऱ्यांनी लवकरच देशातील इतर महानगरांमध्येही शोरूम उघडण्याचे संकेत दिले आहेत.

