(नवी दिल्ली)
करदात्यांना आणि ऑडिटर्सना मोठा दिलासा देणारा निर्णय घेत, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) टॅक्स ऑडिट रिपोर्ट दाखल करण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबरवरून वाढवून ३१ ऑक्टोबर २०२५ केली आहे.
आर्थिक वर्ष २०२४-२५ (असेसमेंट ईयर २०२५-२६) साठी आयकर रिटर्न संदर्भातील ऑडिट रिपोर्ट दाखल करण्याची ही मुदतवाढ जाहीर करण्यात आली असून, याबाबत माहिती सीबीडीटीने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर दिली आहे.
यापूर्वी सरकारने आयकर रिटर्न दाखल करण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढवली होती. त्यामुळे ऑडिटर्सना ऑडिट रिपोर्ट दाखल करण्यासाठी केवळ १५ दिवसांचा कालावधी उपलब्ध होता. इतक्या कमी वेळेत लाखो रिपोर्ट्स दाखल करणे अवघड असल्याने विविध व्यावसायिक संघटना आणि चार्टर्ड अकाउंटंट संघटनांनी मुदतवाढीची मागणी केली होती.
दरवर्षी सुमारे ४० लाख टॅक्स ऑडिट रिपोर्ट दाखल होतात. मात्र, यावर्षी २३ सप्टेंबरपर्यंत फक्त ४ लाख रिपोर्ट दाखल झाले होते. उर्वरित ३६ लाख रिपोर्ट कमी कालावधीत पूर्ण करणे अशक्य असल्याचे स्पष्ट झाले होते.
सीबीडीटीचे निवेदन
सीबीडीटीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “विविध व्यावसायिक संघटनांकडून आणि चार्टर्ड अकाउंटंट संघटनांकडून मिळालेल्या निवेदनांनुसार अनेक करदाते व ऑडिटर्सना वेळेत ऑडिट रिपोर्ट दाखल करण्यात अडचणी येत होत्या. तसेच देशातील काही भागांतील पूर आणि नैसर्गिक आपत्तींमुळेही अडथळे निर्माण झाले होते. या सर्व बाबींचा विचार करून टॅक्स ऑडिट रिपोर्ट दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे.”
उच्च न्यायालयांचे निर्देश
राजस्थान उच्च न्यायालयाच्या जोधपूर पीठाने दिलेल्या एका अंतरिम आदेशात आणि कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसारही अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत वाढवण्याची मागणी पुढे आली होती.
ई-फायलिंग पोर्टल सुरळीत
सीबीडीटीने हेही स्पष्ट केले की, आयकर ई-फायलिंग पोर्टल कोणत्याही तांत्रिक अडथळ्याशिवाय सुरळीत सुरू आहे. २३ सप्टेंबर २०२५ पर्यंत ७.५७ कोटींहून अधिक आयटीआर दाखल झाले होते, तर २४ सप्टेंबरपर्यंत ४.०२ लाख टॅक्स ऑडिट रिपोर्ट अपलोड झाले. त्यापैकी एकट्या २४ सप्टेंबर रोजी ६०,००० हून अधिक रिपोर्ट दाखल करण्यात आले.

