(दापोली / रत्नागिरी)
मुंबईला जाण्यासाठी रेल्वेचे तिकीट काढण्याच्या निमित्ताने घरातून बाहेर पडलेले ४६ वर्षीय रामचंद्र लक्ष्मण गौरत हे साखळोली-पाचांबा परिसरात झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांना उपचारासाठी दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ९ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता मृत घोषित केले. या घटनेमुळे साखळोली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
रामचंद्र गौरत (वय ४६, रा. नवजीवनवाडी, साखळोली, ता. दापोली) हे ८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मुंबईला जाण्यासाठी तिकीट काढण्याकरिता दापोली येथे जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडले होते. मात्र, सायंकाळपर्यंत ते घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. दरम्यान, ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास रामचंद्र गौरत हे साखळोली-पाचांबा येथे ऐनाच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालय, दापोली येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर दुपारी १ वाजता त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची नोंद दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ८५/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ प्रमाणे करण्यात आली आहे. या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट झालेले नसून, दापोली पोलीस पुढील कार्यवाही करीत आहेत.


