(राजापूर / रत्नागिरी)
गोवा बनावटीच्या दारूची विनापरवाना वाहतूक आणि अवैध साठा केल्याप्रकरणी राजापूर पोलिसांनी एका २६ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले. रोहित शिवाजी खानविलकर (वय २६, रा. खडपेवाडी, राजापूर) असे संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून दुचाकी, गोवा बनावटीच्या दारूचे बॉक्स आणि दोन मोबाईल असा एकूण ८३ हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई ९ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११.१५ वाजण्याच्या सुमारास राजापूरमधील गजराळी येथील दातार छापखाना ते साखळकरवाडी जाणाऱ्या रस्त्यावर करण्यात आली.
राजापूर पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल प्रथमेश प्रकाश वारीक (वय ३२) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित खानविलकर हा आकाशी रंगाच्या टीव्हीएस ज्युपिटर दुचाकीवरून गोवा बनावटीच्या दारूची विनापरवाना वाहतूक करीत असताना आढळून आला. तसेच त्याच्याकडे अवैधरीत्या साठवून ठेवलेला दारूचा साठाही मिळून आला. पोलिसांनी केलेल्या कारवाईत ५० हजार रुपये किमतीची टीव्हीएस ज्युपिटर दुचाकी (क्रमांक MH-08-BH-4768), ७ हजार २०० रुपये किमतीचे हायवर्ड्स फाइन व्हिस्कीचे पाच बॉक्स, ७ हजार ८२० रुपये किमतीचे मॅकडॉवेल्स नंबर वनचे दोन बॉक्स, तसेच ८ हजार रुपये किमतीचा ओप्पो एफ१९ आणि १० हजार रुपये किमतीचा सॅमसंग गॅलेक्सी ए३५ असे दोन मोबाईल जप्त करण्यात आले. हायवर्ड्सच्या प्रत्येक बॉक्समध्ये १८० मिलीच्या ४८ बाटल्या, तर मॅकडॉवेल्सच्या एका बॉक्समध्ये ४८ आणि दुसऱ्या बॉक्समध्ये ४४ बाटल्या होत्या.
या प्रकरणी रोहित खानविलकर याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ) आणि ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक आणि साठवणुकीविरोधात राजापूर पोलिसांनी केलेल्या या कारवाईची परिसरात चर्चा सुरू आहे.


