(पुणे / वृत्तसंस्था)
सोने खरेदी करण्याचा बहाणा करून चंदुकाका सराफ अँड सन्स या दुकानातून 14 लाख 78 हजार 760 रुपयांची सोन्याची बिस्किटे घेऊन फरार झालेल्या सराईत ठगाला चंदननगर पोलिसांनी चंद्रपूर येथून अटक केली आहे. सिद्धार्थ देविदास झेंडे (वय 38, रा. म्हसोबाची वाडी, ता. इंदापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून सोन्याची बिस्किटे विकून मिळालेल्या रकमेपैकी 8 लाख 50 हजार रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत.
सिद्धार्थ झेंडे हा स्वतःला ‘प्रगती बिल्डकॉन’ कंपनीचा मालक असल्याचे सांगून लोकांचा विश्वास संपादन करत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्यानंतर कार व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिक तसेच महिलांना लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. छत्रपती संभाजीनगर, पुणे, सोलापूर, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत त्याने अशा प्रकारे फसवणूक केल्याचा पोलिसांना संशय आहे. यापूर्वी त्याच्याविरुद्ध भिगवण आणि विमानतळ पोलिस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.
96 लाखांचे दागिने खरेदी केल्याचा बनाव
चंदननगर परिसरातील चंदुकाका सराफ अँड सन्सच्या दुकानात 3 आणि 4 ऑगस्ट रोजी सिद्धार्थ झेंडे एका महिलेसह गेला होता. दोघे लग्न करणार असल्याचे सांगत त्याने तब्बल 96 लाख रुपयांचे दागिने खरेदी करण्याचे व्यवहार केले. त्यासाठी धनादेश देण्यात आला. मात्र, दागिने नंतर घेऊन जाणार असल्याचे सांगून तो तेथून निघून गेला.
दुसऱ्या दिवशी त्याने संबंधित महिलेला दुकानात पाठवून 14 लाख 78 हजार 760 रुपयांची सोन्याची बिस्किटे धनादेशाच्या माध्यमातून खरेदी केली. मात्र, खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने हा धनादेश बँकेत वटला नाही. त्यानंतर बँक व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
महिलेच्या खात्यातील धनादेशाचा वापर
पोलिसांनी झेंडेसोबत आलेल्या महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केली. या चौकशीत झेंडे याने संबंधित महिलेला लग्नाचे आश्वासन देऊन तिच्या बँक खात्यावरील धनादेशाचा वापर केल्याचे समोर आले.
दरम्यान, पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असता तो मूळ गावी नसल्याचे आढळले. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे झेंडे हा चंद्रपूर येथे असल्याचे शोधून काढले. पोलिसांचे पथक चंद्रपूरला रवाना झाले आणि त्याला ताब्यात घेतले.
सोनाराला विकली सोन्याची बिस्किटे
पोलिसांच्या चौकशीत झेंडे याने इंदापूर येथील एका सोनाराला सोन्याची बिस्किटे विकून त्याबदल्यात रोख रक्कम घेतल्याची माहिती दिली. या व्यवहारातून मिळालेल्या रोख रकमेपैकी 8 लाख 50 हजार रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास चंदननगर पोलिसांकडून सुरू असून, आरोपीने अशाच पद्धतीने आणखी किती जणांची फसवणूक केली आहे, याचा तपास केला जात आहे.

