(मुंबई)
१९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांबाबत प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. “संजय दत्तने शस्त्रांनी भरलेल्या व्हॅनबाबत पोलिसांना वेळेवर माहिती दिली असती, तर १२ मार्च १९९३ चे बॉम्बस्फोट टाळता आले असते,” असे निकम यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. एनडीटीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत निकम म्हणाले, “मला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे. १२ मार्च रोजी मुंबईत स्फोट झाला. एक दिवस आधी संजय दत्तच्या घरी एक व्हॅन पोहोचली होती, ज्यात एके-४७ रायफल्स, हँड ग्रेनेड्स आणि इतर शस्त्रे होती. ही व्हॅन अबू सालेम घेऊन आला होता. संजयने त्यातील काही हँड ग्रेनेड आणि बंदुका उचलल्या होत्या. त्यानंतर त्याने सर्व काही परत दिले, मात्र एक एके-४७ त्याच्याकडे ठेवली. त्याने बंदूक फक्त त्याला शस्त्रांचा शौक असल्यामुळे ठेवली होती. ”
निकम यांनी यावेळी स्पष्ट केले की, “जर त्यावेळी संजयने पोलिसांना ही माहिती दिली असती, तर तपास आधीच सुरू झाला असता आणि स्फोट घडण्याआधीच कट उधळून लावता आला असता. एके-४७ काम करत नव्हती, ही बाब बाजूला ठेवली तरी, पोलिसांकडून लपवून ठेवणे ही गंभीर चूक होती.”
संजय दत्त निर्दोष की चुकलेला?
निकम पुढे म्हणाले, “कायद्याच्या दृष्टीने त्याने गुन्हा केला होता, पण मी वैयक्तिक पातळीवर त्याला साधा, सरळ आणि भावनिक व्यक्ती मानतो. शस्त्रांचा मोह त्याला पडला होता. त्यामुळे त्याने चुकीचे पाऊल उचलले.” १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटात २६७ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी टाडा (TADA) कायद्यांतर्गत संजय दत्त यांना निर्दोष घोषित करण्यात आले, मात्र शस्त्रास्त्र कायद्यानुसार त्यांना दोषी ठरवण्यात आले. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेत एक वर्षाची कपात करून ती ६ वर्षांवरून ५ वर्षांवर आणली. त्यानंतर संजय दत्त यांनी पुण्याच्या येरवडा कारागृहात आपली शिक्षा पूर्ण केली. निकम यांनी सांगितले की, कोर्टाचा निकाल लागल्यानंतर संजय दत्तवर मानसिक ताण आला होता. “त्याची बॉडी लँग्वेज पूर्ण बदलली होती. तो खूप नर्व्हस वाटत होता. मला जाणवले की, त्याच्यावर मोठा मानसिक आघात झाला आहे,” असे ते म्हणाले.
निकम यांनी मुलाखतीत एक किस्सा शेअर करत सांगितले, त्या वेळी मी संजयला म्हटले – ‘संजय, असं करू नकोस. मीडिया तुझ्यावर लक्ष ठेवून आहे. तू अभिनेता आहेस. जर तू खचून गेला, तर लोक तुला दोषी समजतील. तुला अपीलची संधी आहे.’ त्यावर त्याने शांतपणे उत्तर दिलं – ‘हो सर.’

