( पुणे )
कल्याणीनगरमध्ये दोन संगणक अभियंत्यांचा मृत्यू झाला होता त्या पोर्श कार अपघात प्रकरणातील १७ वर्षीय अल्पवयीन आरोपीवर प्रौढांप्रमाणे खटला चालवावा, असा अर्ज पुणे पोलिसांनी बाल न्याय मंडळाकडे केला होता. मात्र, बाल न्याय मंडळाने तो अर्ज फेटाळत आरोपीवर बाल न्याय कायद्यानुसारच खटला चालवला जाईल, असा निर्णय दिला आहे.
ही भीषण दुर्घटना १९ मे २०२४ रोजी रात्री अडीचच्या सुमारास कल्याणीनगर येथे घडली होती. एका महागड्या पोर्श कारने दोन दुचाकीस्वार संगणक अभियंत्यांना जोरदार धडक दिली होती. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी पोर्श कार चालवत असलेला मुलगा केवळ १७ वर्षांचा असल्याचे तपासात स्पष्ट झाले. पोलिस तपासात हेही निष्पन्न झाले की, अपघातापूर्वी आरोपीने पबमध्ये मद्यपान केले होते.
या पार्श्वभूमीवर, विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांच्या माध्यमातून पुणे पोलिसांनी बाल न्याय मंडळाकडे अर्ज सादर केला होता. त्यात आरोपीला ‘सज्ञ’ (सजग, गुन्ह्याचे भान असलेला) मानून प्रौढांप्रमाणे भारतीय दंड संहितेनुसार खटला चालवावा, अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीच्या समर्थनार्थ पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, मद्यपानाचे पुरावे आणि ससून रुग्णालयात रक्तनमुना बदलण्याच्या कथित कटातील सहभाग असे गंभीर पुरावे सादर केले. मात्र, आरोपीच्यावतीने वकील प्रशांत पाटील यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, हा अपघात नकळत घडलेला असून, आरोपीचे पूर्वीचे कुठलेही गुन्हेगारी वर्तन नाही. त्यामुळे त्याला सुधारण्याची संधी देण्यात यावी आणि बाल न्याय कायद्यांतर्गतच खटला चालवावा, अशी मागणी त्यांनी केली.
या युक्तिवादाचा स्वीकार करत बाल न्याय मंडळाने पुणे पोलिसांचा अर्ज फेटाळला. आरोपी अपघातावेळी अल्पवयीन होता, आणि त्याला प्रौढ म्हणून न्यायालयीन कारवाईला सामोरे जाऊ देणे योग्य ठरणार नाही, असे मंडळाने स्पष्ट केले. त्यामुळे आता पुढील सर्व न्यायिक प्रक्रिया बाल न्याय कायद्यानुसारच पार पडणार आहे.