( मुंबई )
देशातील पहिली पर्यावरणपूरक आणि पूर्णतः स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित ई-वॉटर टॅक्सी सेवा १ ऑगस्ट २०२५ पासून अधिकृतपणे कार्यान्वित होणार आहे. या प्रकल्पामुळे समुद्रमार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एक पर्यावरणस्नेही, किफायतशीर आणि जलद पर्याय उपलब्ध होणार आहे. सुरुवातीला ही सेवा गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीटी आणि डोमेस्टिक क्रूझ टर्मिनस ते जेएनपीए या दोन मार्गांवर सुरू होणार आहे. ही सेवा पारंपरिक पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या जलवाहतुकीपेक्षा वेगळी असून ती पूर्णतः इलेक्ट्रिक तंत्रज्ञानावर चालणारी आहे. या नावीन्यपूर्ण योजनेमुळे इंधन खर्चात मोठी बचत होणार असून, सेवा दर सर्वसामान्य प्रवाशांच्या आवाक्यात असणार आहेत. त्यामुळे ही सेवा प्रदूषण, वाहतूक कोंडी आणि खर्च या तीनही समस्यांवर एकात्मिक उपाय ठरणार आहे.
स्वदेशी निर्माण आणि तांत्रिक वैशिष्ट्ये
ही ई-वॉटर टॅक्सी माझगाव डॉक शिपबिल्डिंग लिमिटेड (MDL) ने विकसित केली असून, आतापर्यंत एकूण ६ टॅक्सी तयार करण्यात आल्या आहेत. यातील पहिली वातानुकूलित २४ आसनी टॅक्सी इन्फिनिटी हार्बर सर्व्हिसेस या खासगी कंपनीकडे सुपूर्त करण्यात आली आहे. सध्या ही बोट अंतिम तांत्रिक चाचण्यांच्या टप्प्यावर असून लवकरच ती समुद्रात कार्यरत होईल.
टॅक्सीचे तांत्रिक विशेषताः
-
लांबी: १३.२७ मीटर
-
रुंदी: ३.०५ मीटर
-
प्रवासी क्षमता: २४
-
कमाल वेग: १४ नॉटिकल माईल्स
-
बॅटरी क्षमता: ६४ किलोवॅट (सुमारे ४ तास ऑपरेशन)
-
सुविधा: वातानुकूलन, आधुनिक डिझाईन, शांत प्रवासाचा अनुभव
आगामी योजना आणि विस्तार
भविष्यात या सेवांचा विस्तार बेलापूर, घारापुरी, मांडवा आणि इतर महत्त्वाच्या किनारपट्टी भागांपर्यंत करण्याची योजना आखण्यात आली आहे. यामुळे मुंबई आणि ठाणे परिसरातील लाखो नागरिकांना जलमार्गाने प्रवास करण्याचा एक नवा, सुरक्षित आणि पर्यावरणस्नेही पर्याय उपलब्ध होईल. या सेवेसाठी आवश्यक असलेली चार्जिंग सुविधा सध्या डोमेस्टिक क्रूझ टर्मिनस आणि जेएनपीटी जेट्टी येथे उभारण्यात येत आहे. विशेषतः जेएनपीटीमध्ये स्वतंत्र चार्जिंग पॉइंट उभारण्याचे काम येत्या आठवड्यात सुरू होणार असून, लवकरच त्याचे काम पूर्ण होईल. यामुळे देशांतर्गत पातळीवर इलेक्ट्रिक जलवाहतूक सेवा कार्यक्षमतेने राबवणे शक्य होणार आहे.
यापूर्वी मुंबईत वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली होती, परंतु त्या सेवा पेट्रोल-डिझेलवर आधारित असल्यामुळे त्यांचा ऑपरेटिंग खर्च खूप जास्त होता. परिणामी, तिकीट दर सामान्य प्रवाशांना परवडणारे नव्हते आणि त्या सेवा अल्पावधीतच बंद पडल्या. मात्र, बॅटरीवर चालणाऱ्या ई-वॉटर टॅक्सीमुळे देखभाल खर्च कमी असून सेवा परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणार आहे. ही सेवा सुरू होणे हे भारताच्या स्वदेशी तंत्रज्ञान कौशल्याचे आणि हरित ऊर्जेच्या दिशेने वाटचालीचे प्रतीक आहे. १ ऑगस्टपासून सुरू होणारी ही ई-वॉटर टॅक्सी सेवा निश्चितच मुंबईकरांसाठी आणि पर्यावरणासाठी एक सकारात्मक पाऊल ठरणार आहे.