( परळी )
परळीतील महादेव मुंडे यांच्या निर्घृण खून प्रकरणाला २० महिने उलटले असतानाही, पोलिसांना एकाही आरोपीला अटक करता आलेली नाही. तपास अद्याप सुरुवातीच्या टप्प्यातच अडकलेला असून, आरोपी कोण हेही ठोसपणे निष्पन्न झालेले नाही. दरम्यान, या प्रकरणाचा शवविच्छेदन अहवाल हाती आला असून, त्यामधून हत्या किती अमानुष पद्धतीने करण्यात आली होती, याचे अंगावर काटा आणणारे तपशील उघड झाले आहेत.
महादेव मुंडे यांचा मृतदेह सापडला, तेव्हा चेहरा, छाती, दोन्ही हात आणि शरीराचा बराचसा भाग रक्ताने माखलेला होता. शवविच्छेदन अहवालानुसार, त्यांच्या गळ्यावर, मानेवर, तोंडावर, हातांवर एकूण १६ वार करण्यात आले होते. श्वसननलिका आणि मुख्य रक्तवाहिन्यांवर खोलवर वार झाल्याने अत्यधिक रक्तस्राव होऊन मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या हल्ल्यादरम्यान महादेव मुंडेंनी प्राण वाचवण्यासाठी प्रतिकार केल्याचे पुरावेही अहवालात नमूद आहेत. दोन्ही हातांवर विशेषतः अंगठा, तळहात व बोटांजवळ लढ्याचे खुणा दिसून येतात. एवढेच नव्हे, तर मारहाणीनंतर ते जमिनीवर कोसळले आणि डावा गुडघा खरचटल्याचेही नमूद आहे.
शवविच्छेदन अहवालातील ठळक निष्कर्ष काय?
गळ्यावर एक खोल वार २० सेमी लांब, ८ सेमी रूंद, ३ सेमी खोल, मानेवर उजव्या बाजूला ४ वार, तोंडापासून कानापर्यंत १ खोल वार, उजव्या हातावर ३ वार, डाव्या हातावर देखील ३ वार, तोंडावर, नाकावर, गळ्यावर प्रत्येकी १ वार एकूण १६ वार, त्यातील बहुतांश मृत्यूस कारणीभूत ठरले. दरम्यान, महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केलेल्या आरोपाने प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, आमदार धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरून आरोपी वाल्मिक कराड याने फोन करून तपास थांबवण्याचे दबाव टाकले, असा थेट आरोप त्यांनी केला आहे.
१८ महिने झाले, तरी पोलिसांचा तपास रखडलेला
या घटनेला दीड वर्षाहून अधिक कालावधी उलटला, तरी पोलिसांना अद्याप कोणत्याही आरोपीचा माग काढता आलेला नाही. यामुळे तपास यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पीडित कुटुंब आणि स्थानिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी कधी आणि कोणत्या दिशेने होईल, हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, शवविच्छेदन अहवालातून समोर आलेल्या धक्कादायक तपशीलांमुळे न्यायासाठी लढा अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.