(ठाणे/ शहापूर)
शहापूर येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थिनींसोबत अपमानजनक प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. शाळेतील मुलींच्या स्वच्छतागृहात रक्ताचे डाग आढळल्याच्या पार्श्वभूमीवर, मुख्याध्यापिकेने मासिक पाळी आलेली विद्यार्थिनी शोधण्यासाठी त्यांची अंतर्वस्त्रे काढून तपासणी करण्याचे धक्कादायक कृत्य केले. या प्रकारामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली असून राज्य महिला आयोगाने याची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात संबंधित मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आले असून शाळेची मान्यता रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
शाळेच्या व्यवस्थापनात गंभीर त्रुटी
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी शहापूर येथे पालकांची भेट घेतली व संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी शिक्षण विभाग व पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्राथमिक तपासाची माहिती मिळवली. चाकणकर म्हणाल्या, “शाळेत तक्रार निवारण समिती अस्तित्वात नाही, सखी-सावित्री समिती केवळ नावापुरती आहे आणि त्यांची नोंद केवळ रजिस्टरपुरती मर्यादित आहे, अशा गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत.” शिक्षण अधिकाऱ्यांनी यानंतर शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठविला आहे.
विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तातडीची उपाययोजना
मान्यता रद्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सोमवारपासून नव्याने स्वतंत्र शाळा सुरू करण्याबाबतची कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश शिक्षण विभागाला देण्यात आले आहेत. विद्यार्थिनींचे शिक्षण खंडित होऊ नये, यावर विशेष भर देण्यात आला आहे. या प्रकरणात एकूण ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी ५ जण सध्या पोलिस कोठडीत आहेत. उर्वरित ३ जणांची चौकशी सुरू आहे. शाळेच्या दोन विश्वस्तांवरही गुन्हे दाखल करण्यात आले असून आणखी दोन विश्वस्तांनाही आरोपी करण्यात यावे, अशी मागणी पालकांनी केली आहे, त्यासाठी त्यांनी यापूर्वीच्या काही घटनांचाही उल्लेख केला.
रूपाली चाकणकर यांनी पालक, पोलीस आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन तक्रारींची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले. त्यांनी तपास यंत्रणांना स्पष्टपणे सांगितले की, “जलद गतीने तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल करावं.” या अपमानजनक प्रकारामुळे विद्यार्थिनींच्या मानसिकतेवर परिणाम झाल्याची शक्यता लक्षात घेता, सर्व मुलींना बाल कल्याण समितीमार्फत समुपदेशन देण्याचे निर्देशही रूपाली चाकणकर यांनी प्रशासनाला दिले आहेत.

