(मुंबई)
“मुंबई ही कोणाच्या मालकीची जागा नाही, मुंबई फक्त मराठी माणसाची आहे. अदानी कंपनीने नियमानुसार व्यवसाय करावा, त्यांची दादागिरी आम्ही सहन करणार नाही,” असा इशारा शिवसेना (ठाकरे गट) नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी सोमवारी विधानसभेत दिला. विविध प्रकल्पांतून अदानी समूहाला मुंबईकरांच्या हक्कांवर गदा आणणारी मक्तेदारी दिली जात असल्याचा आरोप त्यांनी सरकारवर केला.
धारावी पुनर्विकास हा जगातला सर्वात मोठा भूखंड घोटाळा
ठाकरे म्हणाले, “धारावी पुनर्विकास प्रकल्प केवळ घरांसाठी नसून तेथे असलेले हजारो लघुउद्योग, कुटीर व्यवसाय देखील महत्वाचे आहेत. मात्र, त्यांच्या पुनर्वसनाचा काहीच विचार न करता ३०० एकर भूखंड अदानीला देण्यात आला आणि त्यात आणखी २४० एकराची भर घातली गेली. त्याचबरोबर ७५०० कोटी रुपयांचा प्रिमियम माफ करून प्रकल्पावर अन्य विकासकांना जबरदस्तीने टीडीआर (हस्तांतरणीय विकास हक्क) घेण्यास भाग पाडले जात आहे.”
सिमेंट रस्त्यांच्या निविदांमध्ये घोटाळा
ठाकरे यांनी मुंबईतील सिमेंट रस्त्यांच्या कामाचा उल्लेख करत सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. “२०२३ मध्ये ६८०० कोटींच्या रस्ते कामांची कंत्राटं केवळ पाच ‘लाडक्या’ ठेकेदारांना देण्यात आली. एका ठेकेदाराला जास्त रकमेची निविदा भरायला लावली, तर इतर चार कंत्राटदारांना कमी रकमेच्या निविदा भरण्यास भाग पाडण्यात आलं. हे सरळ सरळ संगनमताने केलेलं आहे. दोन वर्षांत फक्त ६ टक्के सिमेंट रस्तेच झालेत!”
“मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचा कट”
ठाकरे पुढे म्हणाले, “सिडको, एमएमआरडीए, अटल सेतू, समृद्धी महामार्ग, किनारी रस्ता यांसाठी मुंबई महापालिकेचा निधी वापरला जातो. पण, मुंबईकरांच्या ‘बेस्ट’ला निधी दिला जात नाही. उलट कचरा कर लादला जातो. हे मुंबईकरांवर अन्याय आहे.”
‘चड्डी बनियन गँग’ वरून सभागृहात वाद
भाषणाच्या शेवटी आदित्य ठाकरे यांनी “चड्डी बनियन गँग मुंबईची वाट लावत आहे,” अशी टीका केली. यावर शिवसेना (शिंदे गट) आमदार निलेश राणे यांनी आक्षेप घेत, “हिम्मत असेल तर त्या गँगची नावे घ्या, अन्यथा हा शब्द सभागृहाच्या कामकाजातून वगळा,” अशी मागणी केली. या मुद्द्यावर सभागृहात काही काळ गोंधळ निर्माण झाला.
इतर आमदारांचाही सहभाग
या चर्चेत जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, संजय केळकर, अमीन पटेल, सुलभा खोडके यांच्यासह अनेक आमदारांनी सहभाग घेतला आणि विविध मुद्यांवर सरकारची कोंडी केली.