(रत्नागिरी)
रत्नागिरीतील Flow Zone Art’s and Fitness या संस्थेमधील चार विद्यार्थ्यांची जिम्नॅस्टिक्स या क्रीडाप्रकारासाठी जिल्हास्तरावरून विभागीय पातळीवर निवड झाली आहे. ओजल दामुष्टे, सान्वी तारे, अस्मी फणसेकर आणि समर खरात ही निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे असून, या सर्व विद्यार्थ्यांनी संस्थेचे संस्थापक व प्रमुख प्रशिक्षक श्री. प्रसन्नजित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतले. त्यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनामुळे या विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी करत विभागीय स्तरावर आपली निवड निश्चित केली आहे.
Flow Zone Art’s and Fitness ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून रत्नागिरीत कार्यरत असून, विद्यार्थ्यांच्या कलात्मक आणि शारीरिक विकासासाठी सातत्याने कार्य करत आहे. या संस्थेतील विद्यार्थ्यांनी यापूर्वीही जिल्हा, विभागीय तसेच राज्यस्तरावरही अनेक वेळा उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यामुळे यावेळी झालेली विभागीय निवड ही संस्थेच्या गुणवत्तेची आणि सातत्यपूर्ण प्रशिक्षणाची पुनरावृत्ती आहे.
विद्यार्थ्यांचे वाढते यश हे संस्थेच्या कार्यपद्धतीवरचा विश्वास अधिक दृढ करणारे आहे. त्यांच्या या यशामुळे संस्थेचा आणि रत्नागिरी शहराचा गौरव वाढला असून, भविष्यात हे विद्यार्थी अधिक मोठ्या पातळीवर यश मिळवतील, अशी आशा संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.