( मुंबई )
राज्यात, विशेषतः मालेगावमधील अनधिकृत कत्तलखान्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी विधानपरिषदेत दिली. सण-उत्सवांच्या काळात महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या माध्यमातून काही ठिकाणी तात्पुरते कत्तलखाने उभारले जातात. अशा वेळी वाळू-मातीचा वापर करून रक्तवाहिन्यांमधून होणारी गळती रोखण्याची काळजी घेतली जाते, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील अनधिकृत कत्तलखान्यांबाबत आमदार विक्रांत पाटील यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. यास उत्तर देताना मंत्री सामंत म्हणाले, “मालेगावमधील कुरेशी मोहल्ला ते सरदार चौक परिसरात अनधिकृत कत्तलखान्यांची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. काही ठिकाणी कारवाई झालेली असून, उर्वरित ठिकाणी तातडीने कारवाई केली जाईल. पोलिस प्रशासनाला याबाबत आणखी कडक सूचना दिल्या जातील.”
तसेच, मोसम नदीत रक्तमिश्रित पाणी सोडल्याचे ठोस पुरावे सादर झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध चौकशी करून कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मोसम नदीच्या संवर्धनासाठी राज्य शासनाने १० कोटी ५२ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यापैकी ५ कोटी २६ लाख रुपये मालेगाव महानगरपालिकेला वितरित करण्यात आले असल्याची माहितीही मंत्री सामंत यांनी यावेळी सभागृहात दिली.